आंबेनळी घाटत भीषण अपघात! ९०० फूट खोल दरीत कोसळली कार, साताऱ्यातील ८ जण ठार

आंबेनळी घाटत भीषण अपघात! ९०० फूट खोल दरीत कोसळली कार, साताऱ्यातील ८ जण ठार

 


पोलादपूर: आंबेनळी घाटात रविवारी (२४ मे) रात्री भीषण अपघात झाला. एक स्कॉर्पिओ गाडी अंदाजे ९०० फूट खोल दरीत कोसळली. या घटनेत कारमधील आठ जणांचा जागेवरच मृत्यू झाला असून, त्यातील तिघांचे मृतदेह वर आणण्यात यश आले आहे. महाबळेश्वर ते पोलादपूर दरम्यान घाटात ही घटना घडली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री महाबळेश्वर-पोलादपूर रस्त्यावर आंबेनळी घाटातून गाडी जात होती. ही गाडी ९०० फूट खोल दरीत कोसळली. गाडीतील ८ जणांचा जागीच मृत्यू झाला असून, महामार्ग पोलिसांना घटनेची माहिती मिळताच मदत मोहीम सुरू करण्यात आली.

रात्रीपासूनच बचाव कार्य

पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. प्रशासनातील अधिकारीही घटनास्थळी दाखल झाले. महाबळेश्वर ट्रेकर्स व प्रतापगड सर्च अँड रेस्क्यू टीमच्या मदतीने रात्री १० वाजता मदत आणि बचाव कार्य सुरू करण्यात आले. हा अपघात कसा घडला, याबद्दल मात्र अद्याप कारण समोर आलेले नाही. ३ जणांचे मृतदेह दरीमधून काढण्यात यश आले आहे. 

अपघात झाला त्यावेळी गाडीमध्ये कोण-कोण होते?

ज्या गाडीचा अपघात झाला, त्या गाडीत महेश अनिल पवार (वय २५), आदित्य अशोक साळुंखे (वय २१), रितेश राजेंद्र लोखंडे (वय २५), सुहास जितेंद्र लोखंडे (वय २०), अशं समीर चव्हाण (वय १८), उत्कर्ष आनंद शिंगटे (वय २१), अनिल अभिमन्यू शिंगटे (वय २५) आणि नितीन किसन नायकोंडे (वय ३५) हे प्रवास करत होते.