आंबेनळी घाटानंतर धुळ्यात भीषण तिहेरी अपघात; ५ जणांचा मृत्यू तर २८ जखमींवर उपचार सुरू

आंबेनळी घाटानंतर धुळ्यात भीषण तिहेरी अपघात; ५ जणांचा मृत्यू तर २८ जखमींवर उपचार सुरू

 

​धुळे: शहरानजिक लळिंग घाटात सोमवारी पहाटे वाळूची वाहतूक करणारे दोन ट्रक व खाजगी ट्रॅव्हलच्या  तिहेरी अपघात झाला. या भीषण अपघातात 5 जण ठार तर 28 जण जखमी झाले आहेत. घटनास्थळावरून एकूण ३३ व्यक्तींना तातडीने भाऊसाहेब हिरे वैद्यकीय रुग्णालयात आणण्यात आले होते. मात्र, या 33 पैकी 5 जणांचा रुग्णालयात आणण्यापूर्वीच  मृत्यू झाला होता.

दुर्दैवी बाब म्हणजे या ५ मृतांपैकी आतापर्यंत केवळ एकाच व्यक्तीची ओळख पटू शकली असून, मनोज प्रकाश नरव्हाळ असे त्याचे नाव आहे. ट्रकचालक मनोज नरवाळ हा मालेगाव येथील रहिवासी आहे. उर्वरित ४ मृतांची ओळख पटवण्याचे काम प्रशासनाकडून युद्धपातळीवर सुरू आहे.

गंभीर व किरकोळ जखमी झालेल्या उर्वरित २८ रुग्णांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत. या सर्व २८ रुग्णांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.  या घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासनाने रुग्णालयात धाव घेतली आहे.

आंबेनळी घाटात मृत्यूचं तांडव!

आंबेनळी घाटात रविवारी (२४ मे) रात्री भीषण अपघात झाला. एक स्कॉर्पिओ गाडी अंदाजे ९०० फूट खोल दरीत कोसळली. या घटनेत कारमधील आठ जणांचा जागेवरच मृत्यू झाला असून, त्यातील तिघांचे मृतदेह वर आणण्यात यश आले आहे. महाबळेश्वर ते पोलादपूर दरम्यान घाटात ही घटना घडली आहे.