धोका वाढला! इबोला व्हायरसचा वेगाने प्रसार; ५०० रुग्ण, १३० जणांचा मृत्यू; जागतिक आरोग्य संघटनेकडून अलर्ट जारी
आंतरराष्ट्रीय आरोग्य नियमांच्या कलम १२ अंतर्गत दोन्ही देशांच्या आरोग्य मंत्र्यांशी चर्चा केल्यानंतर हे पाऊल उचलण्यात आलं आहे. आज इमर्जन्सी समितीची बैठक बोलावण्यात येणार आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) मते, इटुरी येथून ३० रुग्ण समोर आले आहेत. युगांडाची राजधानी कंपाला येथेही काही रुग्णांची पुष्टी झाली आहे.
संक्रमण आणखी पसरू शकते आणि मृतांची संख्या वाढू शकते असा इशारा WHO ने दिला आहे. ५०० हून अधिक संशयित रुग्ण आणि १३० जणांच्या मृत्यूची माहिती समोर आली आहे. हे आकडे पुढे बदलू शकतात. आरोग्य कर्मचाऱ्यांचाही मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. इटुरी प्रांतात सध्या असुरक्षिततेचं वातावरण आहे. तिथे लोकांची ये-जा मोठ्या प्रमाणावर होते. याच कारणामुळे संसर्ग आणखी पसरण्याचा धोका वाढला आहे.
इबोला म्हणजे काय?
इबोला हा एका धोकादायक व्हायरसमुळे होणारा आजार आहे. अनेक प्रकरणांमध्ये हा जीवघेणा ठरू शकतो. हा व्हायरस संक्रमित व्यक्तीच्या शरीरातील द्रवपदार्थ, जसं की रक्त, उलट्या, घाम किंवा वीर्य यांच्या संपर्कात आल्याने एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीमध्ये पसरण्यासाठी ओळखला जातो.
WHO ने माहिती दिली आहे की ही साथ 'बंडिबुग्यो व्हायरस'मुळे पसरली आहे. हा इबोला व्हायरसचाच एक प्रकार आहे, ज्याच्यावर कोणतीही लस किंवा ठोस उपचार उपलब्ध नाही. लस उपलब्ध नसली, तरी व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी आणि लोकांची जीव वाचवण्यासाठी देश इतर अनेक पावलं उचलू शकतात. यामध्ये लोकांपर्यंत योग्य माहिती पोहोचवणं आणि जनजागृतीमध्ये समुदायाचा सहभाग वाढवणं यांसारख्या उपायांचा समावेश आहे.