पुण्यातील ‘राष्ट्रवादी’त अस्वस्थता; प्रमुख पदाधिकाऱ्यांची पक्षाकडे पाठ?

पुण्यातील ‘राष्ट्रवादी’त अस्वस्थता; प्रमुख पदाधिकाऱ्यांची पक्षाकडे पाठ?

 

पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाची धुरा सांभाळणाऱ्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि खासदार, पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस पार्थ पवार यांच्याकडून पुण्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने पुण्यातील पदाधिकाऱ्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. विधान परिषदेत आमदार आणि पुणे महापालिकेत स्वीकृत नगरसेवक होण्याची संधी गेल्याने प्रमुख पदाधिकारी नाराज झाल्याने त्यांनी पक्षाकडे पाठ फिरवल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

अजित पवार हे पुण्यातील पदाधिकाऱ्यांच्या सतत संपर्कात असायचे. ते महिन्यातून किमान एकदा तरी पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन आढावा घेत असत. त्यांच्या निधनानंतर पक्षाच्या नेत्यांचा आणि पदाधिकाऱ्यांचा संपर्क तुटल्यासारखी स्थिती झाली आहे. पक्षाची धुरा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि खासदार पार्थ पवार यांच्याकडे आल्यानंतर त्यांचा आणि पदाधिकाऱ्यांचा संवाद कमी झाल्याचे दिसून येत आहे.

संधी गेल्याने पदाधिकारी निराश

पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना विधान परिषदेत संधी मिळण्याची आशा होती. तसेच काही पदाधिकारी हे पुणे महापालिकेत स्वीकृत नगरसेवक पद मिळण्यासाठी आग्रही होते. स्वीकृत नगरसेवक पदासाठी ज्येष्ठ पदाधिकारी हे प्रयत्न करत होते. मात्र, त्यांच्याऐवजी माजी महापौर दत्तात्रय धनकवडे आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष राकेश कामठे यांची निवड करण्यात आली. त्यामुळे ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी पसरली. त्यापैकी काहीजणांनी पक्षाच्या नियमित बैठकांकडेही पाठ फिरवली आहे.

विधान परिषदेत पुण्याला स्थान देण्यात आले नाही. ‘राष्ट्रवादी’ने झिशान सिद्दीकी यांना संधी दिल्याने पुण्यातील पदाधिकारी नाराज झाले. त्यामुळे पक्षाच्या नियमित बैठकांमध्ये खंड पडला असल्याचे काही पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

नेते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये अंतर?

पक्षाच्या नेत्यांकडून संधी न दिल्याने नाराज झालेले पदाधिकारी आणि नेते यांच्यात अंतर पडल्यासारखे चित्र निर्माण झाले आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने पुणे दौऱ्यावर आल्यानंतर मोजकेच पदाधिकारी हे त्यांच्या भेटीसाठी जात असतात. नाराज पदाधिकारी हे भेट टाळत असल्याचे पदाधिकाऱ्यांकडून स्पष्ट करण्यात आले.

अद्यापही पदाधिकारी आशावादी

स्थानिक स्वराज संस्था मतदार संघाच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यामध्ये पुणे स्थानिक स्वराज संस्था मतदार संघाची जागा ही ‘राष्ट्रवादी’ची आहे. या मतदार संघातून गेल्या निवडणुकीत तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेसने अनिल भोसले यांना संधी दिली होती. आता या जागेवर संधी मिळण्यासाठी काही पदाधिकारी हे अद्यापही आशावादी आहेत. त्यासाठी संबंधितांनी हालचाली सुरू केल्या आहेत. ही निवडणूक झाल्यानंतर २०२९ पर्यंत निवडणुका नसल्याने विधान परिषदेत जाण्यासाठी इच्छुक पदाधिकाऱ्यांनी नेत्यांच्या गाठीभेटी सुरू केल्या आहेत.