केरळमध्ये आज मान्सून दाखल होणार, ८ राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज; हवामान विभागाने काय सांगितले?
पुणे: मान्सून आज केरळात दाखल होणार आहे. भारतीय हवामान विभागाने मंगळवार २७ मे रोजी केरळमध्ये मान्सूनचे आगमन होऊ शकते, असा अंदाज वर्तवला होता. या दक्षिण भारतीय राज्यात मुसळधार पाऊस सुरू असला तरी, विभागाने मान्सूनबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.
त्याच्या आगमनासाठी परिस्थिती अनुकूल असल्याचे म्हटले जात आहे. देशातील अनेक राज्यात उष्णता मोठी वाढली आहे.
भारतीय हवामान विभागाने मंगळवारी दिलेल्या माहितीनुसार, पुढील दोन ते तीन दिवसांत नैऋत्य आणि आग्नेय अरबी समुद्र, कोमोरिन प्रदेश, बंगालचा उपसागर आणि उर्वरित अंदमान आणि निकोबार बेटांमध्ये मान्सून पुढे सरकण्यासाठी परिस्थिती अनुकूल आहे. यामुळे मान्सूनला केरळमध्ये पोहोचायला वेळ लागू शकतो. केरळमध्ये मान्सूनच्या आगमनाची सामान्य तारीख १ जून आहे.
तीव्र उष्णतेचा सर्वाधिक फटका वायव्य भागाला बसण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने आता २८ आणि २९ मे रोजी जम्मू आणि काश्मीर तसेच हिमाचल प्रदेशात पावसाचा अंदाज वर्तवला आहे. २७ मे रोजी पंजाब, हरयाणा, चंदीगड, दिल्ली आणि पूर्व उत्तर प्रदेशात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. २८ आणि २९ मे रोजी राजस्थानमध्येही पावसाची शक्यता आहे.
महाराष्ट्रात पाऊस कधीपासून सुरू होणार?
१ जून रोजी मान्सून केरळच्या किनारपट्टीवर दाखल होत असतो. आणि तिथून पुढे अनुकूल स्थिती असल्यास मान्सून वेगाने महाराष्ट्राच्या दक्षिण किनारपट्टीवर दाखल होतो. यंदा मान्सून ५ जूनच्या आसपास दक्षिण कोकणात दाखल होण्याचा अंदाज आहे.
केरळच्या अनेक जिल्ह्यांमध्ये सतर्कतेचा इशारा
हवामान विभागाने केरळच्या बहुतांश भागांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. तिरुवनंतपुरम, कोल्लम, अलाप्पुझा आणि एर्नाकुलम या चार जिल्ह्यांसाठी यलो अलर्टही जारी करण्यात आला आहे. बुधवारी एर्नाकुलम वगळता इतर तीन जिल्ह्यांसाठीही यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
२७ मे रोजी तामिळनाडू, पुदुचेरी आणि कराईकलमध्ये अतिवृष्टी अपेक्षित आहे. केरळमध्ये २७-२८ मे आणि ३०-३१ मे रोजीही अशीच हवामान परिस्थिती अपेक्षित आहे. ३० आणि ३१ मे रोजी लक्षद्वीपमध्ये, तर २८ मे रोजी उत्तर अंतर्गत कर्नाटकमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे.