"शिक्षणमंत्र्यांवर अजूनही कारवाई का नाही?" नीट पेपरफुटी प्रकरणावर राहुल गांधींचा संताप
प्रसार माध्यमांशी बोलताना राहुल गांधी यांनी म्हटले की, “नीट परीक्षेचा पेपर २०२४ मध्येही फुटला. त्यावेळी ना परीक्षा रद्द झाली, ना शिक्षणमंत्र्यांनी राजीनामा दिला. फक्त सीबीआय चौकशी झाली, पण त्यातून काय निष्पन्न झाले? आता २०२६ मध्ये पुन्हा तोच प्रकार घडला. यावेळी परीक्षा रद्द झाली, मात्र शिक्षणमंत्र्यांवर कोणतीही कारवाई झाली नाही.” राहुल गांधी पुढे म्हणाले की, “देशभरातील विद्यार्थी आणि पालक चिंतेत आहेत. वारंवार पेपर कसा फुटतोय? तरीही सरकार गप्प का आहे? अशा शिक्षणमंत्र्याकडून राजीनामा का घेतला जात नाही?" असा सवाल त्यांनी केला.
प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन केंद्र सरकारने या पेपरफुटीचा तपास सीबीआयकडे सोपवला आहे. तपासादरम्यान आतापर्यंत दोन कथित सूत्रधारांना अटक करण्यात आली असून, इतर आरोपींचा शोध सुरू आहे. तपास यंत्रणांच्या मते, प्रश्नपत्रिका गळतीचे जाळे अनेक राज्यांपर्यंत पसरले असण्याची शक्यता आहे. त्यामुळे देशभरात छापे आणि चौकशी मोहीम सुरू करण्यात आली आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये प्रचंड नाराजी व्यक्त केली जात आहे. कठोर मेहनत करून परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ झाल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, प्रश्नपत्रिका फुटल्याच्या आरोपांनंतर एनटीए यांच्याकडून घेण्यात आलेली नीट परीक्षा रद्द करण्यात आली. ही परीक्षा ३ मे रोजी पार पडली. मात्र, पेपरफुटीचे पुरावे समोर आल्यानंतर परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे देशभरातील लाखो विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा द्यावी लागणार आहे. नव्या परीक्षेच्या तारखा आणि प्रवेशपत्रांबाबतची माहिती लवकरच अधिकृत माध्यमांतून जाहीर केली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.