'रखरखत्या उन्हात करणार कठोर उपोषण, मरण आलं तरी चालेल!'; मनोज जरांगेंची घोषणा!
गुरुवार, २८ मे, २०२६
Edit
अंतरवाली सराटी (जालना): "आतापर्यंत
मी सरकारच्या शब्दावर विश्वास ठेवून खूप वेळ दिला, तब्बल १० महिने थांबलो.
पण सत्तेत बसलेले लोक मराठ्यांचा द्वेष करत आहेत. आता मी सहन करण्याच्या
शेवटच्या सीमा रेषेवर आलो असून, ३० मेपासून देशाच्या इतिहासात कधीही झाले
नसेल, असे सर्वात कठोर आणि आमरण उपोषण करणार आहे. या उपोषणाला ना मंडप
असेल, ना पंखा, ना सावली! भर रखरखत्या उन्हात, अनवाणी पायाने मी बाज टाकून
बसणार आहे. यात उष्मघाताने माझा बळी गेला, तरी मला पर्वा नाही," अशा
शब्दांत मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारविरुद्ध 'आरपार'च्या लढाईचे रणशिंग फुकले आहे.
जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप आणि महायुती सरकारच्या क्रूरतेवर अत्यंत गंभीर आणि शेलके आरोप केले.
"तुमच्या लेकराबाळांसाठी प्राण द्यायलाही तयार!"
मनोज
जरांगे पाटील म्हणाले की, मराठा आणि कुणबी एकच आहेत, हे सिद्ध झाले असूनही
सरकारने अद्याप 'मराठा-कुणबी मंत्रालय' स्थापन केले नाही. "मला आता
कोणतीही 'सकारात्मक चर्चा' नकोय, तर थेट मागण्यांची 'अंमलबजावणी' पाहिजे.
सरकारने सगेसोयऱ्यांच्या अध्यादेशाची अंमलबजावणी करावी. माझ्या शरीरात
सध्या खूप वेदना आहेत, सलग तीन वर्षे झाली मी आंदोलन करतोय. पण वेळ पडली तर
मराठ्यांच्या लेकराबाळांसाठी मी माझा जीव द्यायला तयार आहे."
"फडणवीस किती मोठे 'कलाकार' आहेत हे आता प्रसाद लाडांना समजेल!"
भाजप नेते प्रसाद लाड यांच्यावर थेट निशाणा साधत जरांगे म्हणाले, "प्रसाद लाड यांचे आता डोळे उघडतील की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
किती मोठे कलाकार आहेत! फडणवीसांच्या मनात मराठ्यांविषयी ठासून द्वेष भरला
आहे, हे आता भाजपमधील मराठा मंत्र्यांनीही नीट जाणून घ्यावे. या सरकारला
केवळ 'लावालाव्या' करण्यापलिकडे काहीही जमत नाही. उपमुख्यमंत्री सुनेत्रा
पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे लोक मराठ्यांसाठी काम करू
इच्छितात, पण हा 'कलाकार' त्यांना काम करू देत नाही."
"मराठे मराठ्यांच्या अंगावर घालताय; तोडायची भाषा केली तर बघून घेऊ!"
सरकारवर
क्रूरतेचा आरोप करताना जरांगे म्हणाले, "मराठवाड्याला पाणीही नाही आणि
हक्काचे आरक्षण असूनही ते दिले जात नाही. उलट मराठे मराठ्यांच्या अंगावर
घालून समाजात फूट पाडण्याचा नीच धंदा सुरू आहे. इतकं क्रूर सरकार
महाराष्ट्राच्या इतिहासात कधी आलं नसेल. जर तुम्ही मराठ्यांना तोडण्याची
भाषा करत असाल, तर एकदा तोडूनच पहा, आम्हीही आरपार खेटायला तयार आहोत!"
मराठा समाजाला जरांगेंचे मोठे आवाहन: "अंतरवालीकडे येऊ नका, धिंगाणा घालू नका"
३०
मे पासून सुरू होणाऱ्या या ऐतिहासिक उपोषणाच्या पार्श्वभूमीवर जरांगे
पाटील यांनी मराठा समाजाला शांततेचे आवाहन केले आहे. "या कठोर
उपोषणादरम्यान मराठा समाजातील कोणीही बांधवाने अंतरवाली सराटीकडे गर्दी करू
नये. तसेच माझ्या उपोषणावरून राज्यात कुठेही उद्रेक, हिंसाचार किंवा
धिंगाणा घालायचा नाही. मराठ्यांना लढल्याशिवाय कधी काही मिळाले नाही,
त्यामुळे हा लढा पूर्णपणे शांततेत पण कडक पद्धतीने लढला जाईल," असे जरांगे
यांनी स्पष्ट केले.