मराठा आरक्षणासाठी जरांगेंचा सरकारला २८ मे पर्यंतचा अल्टिमेटम; मागण्या मान्य न केल्यास ३० मेपासून उपोषण
मुंबई: मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरुन मनोज जरांगेंनी सरकारला २८ मेपर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. मागण्या मान्य न झाल्यास 30 मेपासून अंतरवाली सराटीत उपोषणाचा इशारा दिला आहे. विशेष म्हणजे, सरकारशी संवादासाठी आता भाजप आमदार प्रसाद लाड पुढे सरसावले आहेत. जरांगे-लाड यांच्या दोन तासांच्या बैठकीनंतर नेमकं काय झालं? जाणून घ्या.
मराठा आरक्षणाच्या मुद्यावर मनोज जरांगेंनी ३० मे पासून उपोषण करण्याची घोषणा केली आहे. यावेळचं आंदोलन अंतरवाली सराटीत करणार असल्याची जरांगेंनी घोषणा केली आहे. जरांगेंच्या या घोषणेनंतर सरकारकडून आमदार प्रसाद लाड यांनी चर्चेसाठी अंतरवाली सराटी गाठलं. जरांगे आणि लाड यांच्यात दोन तास चर्चा झाली. शिवाय काहीवेळ दोघांनीही बंद दाराआडही चर्चा केली. मराठा समाजाच्या मागण्या २८ मे पर्यंत पूर्ण कराव्या अन्यथा ३० मे पासून उपोषणाला बसणार असल्याचं जरांगेंनी जाहीर केलंय. तर प्रसाद लाड यांनी जरांगेंच्या मागण्यांबाबत सरकार सकारात्मक असून उपोषण न करण्याचं आवाहन जरांगेंना केलं आहे.
मराठा समाजाच्या मागण्या जरांगेंनी पुन्हा प्रसाद लाड यांच्यासमोर ठेवल्या. या मागण्या खालीलप्रमाणे आहेत.
- हैदराबाद गॅझेटियरनुसार कुणबी प्रमाणपत्रांचे थांबवलेलं वाटप सुरु करावे
- २९ मेपर्यंत मराठवाड्यात कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप करावे
- कुणबी नोंदी सापडलेल्या ५८ लाख मराठ्यांना तातडीनं प्रमाणपत्र द्या
- सातारा गॅझेटियरनुसार तातडीनं जीआर काढा
- १९९४ च्या धर्तीवर सातारा, कोल्हापूर, पुणे संस्थानचा प्रलंबित जीआर काढा
- राज्यातील मराठ्यांवरील सर्व गुन्हे सरसकट मागे घ्यावेत
- सगळ्या योजना पुन्हा सुरु करा, एकही योजना बंद होऊ नये
- आरक्षणासाठी बलिदान देणा-या कुटुंबाला महावितरण आणि MIDCमध्ये नोकरीचा जीआर काढा
- आरक्षणासाठी नेमलेली मंत्रिमंडळ बरखास्त करा
- आरक्षणासाठी नव्यानं समिती स्थापन करा अशा मागण्या करण्यात आल्यात.
या मागण्या उपसमितीकडं घेऊन जाण्याची ग्वाही लाड यांनी दिलीय. आतापर्यंत अनेकांवर विश्वास ठेवला आता लाड यांच्यावर विश्वास ठेऊन पाहतो असं जरांगेंनी म्हटलं आहे.
मराठा समाज आणि सरकारमधील दुवा म्हणून प्रसाद लाड यांनी काम सुरु केलंय. प्रसाद लाड यांनी स्वतःच्या खांद्यावर घेतलेली जबाबदारी यशस्वीपणं पार पाडतात का याबाबत उत्सुकता निर्माण झालीये.