पुणे स्थानिक स्वराज्य संस्थेची जागा भाजपनेच लढवावी; आमदारांची मुख्यमंत्री फडणवीसांकडे आग्रही मागणी
पुणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधानपरिषदेवर निवड होणाऱ्या एका जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार दावा करत आहे. विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास आजपासून सुरुवात झाली असून, पुण्यात भाजपच्या उमेदवारीसाठी हालचालींना वेग आला आहे. याच पार्श्वभूमीवर शहर व जिल्ह्यातील आमदारांनी मुख्यमंत्री कार्यालयात देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत पुण्याची जागा भाजपकडे घेण्याची भूमिका मांडली. यावेळी आमदार राहुल कुल, हेमंत रासने, सुनील कांबळे, शंकर जगताप, भीमराव तापकीर, माजी आमदार संजय जगताप, बाळा भेगडे, पुणे महापालिकेचे सभागृह नेते गणेश बिडकर, जिल्हाध्यक्ष प्रदीप कंद यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
या जागेसाठी नगरपंचायत, नगरपालिका, महापालिका आणि जिल्हा परिषदेचे ८१० सदस्य हे मतदार आहेत. त्यात राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे ३४४ सदस्य आहेत. त्याखालोखाल भाजपचे ३०९ सदस्य निवडून आले आहेत. याशिवाय दौंडमधील ‘नागरिक हित संरक्षण मंडळ विकास आघाडी’चे १७ सदस्य तसेच इंदापूरमधील ‘कृष्णा भीमा विकास आघाडी’चे सात सदस्य भाजपसोबत असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे भाजपकडे ३३३ पेक्षा अधिक मतांचे भक्कम संख्याबळ आहे. तसेच काही अपक्ष सदस्यांचाही पाठिंबा वाढत आहे. पुणे महापालिकेचे सभागृह नेते गणेश बिडकर हेदेखील विधान परिषद निवडणुकीसाठी इच्छुक असून त्यांनी स्थानिक पातळीवर जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. मुख्यमंत्र्यांच्या भेटीदरम्यान बिडकर यांनी स्थानिक कार्यकर्त्यांच्या भावना मांडत, पक्षाने संधी दिल्यास पूर्ण ताकदीने निवडणूक लढवून विजय मिळवण्याचा विश्वास व्यक्त केला.