ब्युटी पार्लर ते घरातले 'स्पेशल वर्ग'; पुण्यातील 'या' दोन महिलांनी 'नीट' चा पेपर कसा फोडला?
ब्युटी पार्लरमधील 'ती' भेट अन् पेपरफुटीचा प्लॅन
तपास यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार, या संपूर्ण रॅकेटची सुरुवात पुण्याच्या कात्रज भागातील राजस सोसायटी परिसरात झाली. गंगा ओशन सोसायटीत राहणाऱ्या ब्युटीशियन मनीषा वाघमारे हिच्या पार्लरमध्ये मॉडर्न महाविद्यालयातील प्राध्यापिका मनीषा गुरुनाथ मांढरे या नियमित जात असत. या ब्युटी पार्लरमधील गप्पांमधून दोघींची घट्ट मैत्री झाली.
प्राध्यापिका मनीषा मांढरे यांची राष्ट्रीय परीक्षा संस्थेकडून नीट परीक्षेसाठी तज्ज्ञ म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यामुळे त्यांच्याकडे बॉटनी आणि झूलॉजी या विषयांच्या मूळ प्रश्नपत्रिकांचा थेट ॲक्सेस होता. मांढरे यांनी ही गोपनीय माहिती ब्युटीशियन मनीषा वाघमारेला दिली. वाघमारे हिचा परिसरातील विद्यार्थी आणि पालकांमध्ये चांगला संपर्क होता. या ओळखीचा फायदा घेऊन दोघींनी मिळून घरातूनच एक गुप्त खासगी मार्गदर्शन वर्ग सुरू केला.
एप्रिलमध्ये 'त्या' क्लासमध्येच फुटला होता पेपर
३ मे २०२६ रोजी झालेल्या मुख्य परीक्षेच्या आधी म्हणजेच एप्रिल महिन्यातच या दोघींनी निवडक विद्यार्थ्यांना एकत्र करून विशेष वर्ग घेतले. या वर्गांमध्ये विद्यार्थ्यांना संभाव्य प्रश्न म्हणून थेट मूळ परीक्षेत येणारे प्रश्नच वहीत लिहून घेण्यास सांगितले गेले, तसेच पुस्तकांमध्ये महत्त्वाचे प्रश्न म्हणून टीक करून दिले. या गुप्त वर्गात विद्यार्थ्यांना जे प्रश्न, पर्याय आणि संभाव्य उत्तरे सांगण्यात आली होती, तेच प्रश्न ३ मे रोजी झालेल्या नीटच्या मुख्य प्रश्नपत्रिकेत जसेच्या तसे आले. हा फक्त योगायोग नव्हता तर थेट पेपरफुटल्याचा पुरावा होता.
स्थानिक रहिवासी थक्क
मनीषा वाघमारे हिचे पती डेंटिस्ट आहेत, तर प्राध्यापिका मनीषा मांढरे या कौटुंबिक वादामुळे पतीपासून विभक्त राहत होत्या. अत्यंत शांत आणि सुशिक्षित वाटणाऱ्या या महिला एवढ्या मोठ्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या घोटाळ्यात सामील असतील, यावर आजूबाजूच्यांना विश्वास बसत नाहीये.
कुलकर्णी आणि 'आरसीसी'चे मोटेगावकर सीबीआयच्या जाळ्यात
या प्रकरणात फक्त या दोन महिलाच नव्हत्या, तर एनटीएच्या परीक्षा प्रक्रियेशी संबंधित असलेले रसायनशास्त्राचे प्रसिद्ध व्याख्याते प्रा. पी. व्ही. कुलकर्णी यांचेही नाव समोर आले. कुलकर्णी यांनीही मनीषा वाघमारेच्या संर्पकातून विद्यार्थ्यांना परीक्षेआधीच प्रश्न आणि उत्तरे पुरवल्याचा गंभीर आरोप सीबीआयने केला आहे. सीबीआयने मोटेगावकर यांनाही अटक केली असून, त्यांच्या एका संशयास्पद व्हिडिओमुळे ते अडचणीत आले. आरसीसी क्लासने विद्यार्थ्यांना सरावासाठी दिलेल्या १०१ प्रश्नांपैकी बहुतांश प्रश्न नीटच्या मुख्य परीक्षेत जसेच्या तसे आले होते.
विद्यार्थी आणि पालकही रडारवर
या पेपरफुटीच्या बदल्यात कोट्यवधी रुपयांची उलाढाल झाल्याचा संशय आहे. त्यामुळे आता ईडी देखील या प्रकरणात तपास करत आहे. शिवराज मोटेगावकर यांच्या नावावर असलेल्या स्थावर आणि जंगम मालमत्तेची, तसेच त्यांच्या विविध बँक खात्यांमधील आर्थिक व्यवहारांची छाननी ईडीकडून सुरू झाली आहे. ज्या विद्यार्थ्यांनी किंवा पालकांनी लाखो रुपये देऊन परीक्षेआधीच हे प्रश्न मिळवले होते, त्यांची यादी सीबीआयने तयार केली असून, लवकरच त्यांच्यावरही कडक कायदेशीर कारवाई होण्याची शक्यता आहे.