मान्सून महाराष्ट्रात 'या' तारखेपर्यंत धडकणार; मुसळधार पावसाचा इशारा, हवामान विभागाचा अंदाज

मान्सून महाराष्ट्रात 'या' तारखेपर्यंत धडकणार; मुसळधार पावसाचा इशारा, हवामान विभागाचा अंदाज

भारतीय हवामान विभागाने (IMD) देशातील मान्सूनच्या वाटचालीबाबत आणि आगामी दोन आठवड्यांच्या हवामान अंदाजाबाबत माहिती दिली आहे. मे महिन्याच्या अखेरीस उत्तर आणि मध्य भारताला होरपळवून काढणारी उष्णतेची लाट आता ओसरली असून, देशात मान्सून वेगाने पुढे सरकत आहे. ४ जून रोजी मान्सूनने केरळसह कर्नाटक आणि तामिळनाडूच्या काही भागांत प्रवेश केला आहे. 

महाराष्ट्रात मान्सून कधी? 

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुढील २ ते ३ दिवसांत मान्सून संपूर्ण गोवा आणि महाराष्ट्राच्या काही भागांत धडकण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे. पहिल्या आठवड्यात (४ ते १० जून) कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दुसऱ्या आठवड्यात (११ ते १७ जून) संपूर्ण देशात सरासरीपेक्षा कमी पाऊस राहण्याचा अंदाज असला, तरी महाराष्ट्र (कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा), कर्नाटक, तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये मात्र पाऊस सामान्य किंवा सामान्यपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे. या काळात महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस होऊ शकतो.

 काही राज्यांत पुन्हा उष्णतेची लाट

एकीकडे मान्सूनची प्रगती होत असतानाच, दुसऱ्या बाजूला काही राज्यांमध्ये पुन्हा उष्णतेचा कडाका वाढणार आहे. ६ ते ८ जून दरम्यान बिहारमध्ये, तर ७ ते १० जून दरम्यान पूर्व आणि पश्चिम उत्तर प्रदेशमध्ये काही ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. याशिवाय ओडिशा, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूमध्ये दमट आणि उष्ण हवामान राहील.

वादळी वारा, विजा आणि गारपिटीचा इशारा 

पहिला आठवडा- ४ ते १० जून उत्तर-पूर्व भारत: आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर आणि अरुणाचल प्रदेशमध्ये वादळी वाऱ्यासह (४०-५० किमी प्रतितास) मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा आहे.

 दक्षिण भारत: तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि केरळमध्ये ५० ते ६० किमी प्रतितास वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस होऊ शकतो.  

उत्तर आणि मध्य भारत: जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि राजस्थानमध्ये ४ आणि ५ जून रोजी गारपीट  होण्याची शक्यता आहे.