"बारामतीत एफडीए व पोलिसांची संयुक्त कारवाई! प्रतिबंधित गुटखा-पानमसाल्याचा साठा जप्त, दुकानदार गजाआड"
बारामती:- महाराष्ट्र शासनाने सार्वजनिक आरोग्याच्या हितासाठी राज्यात प्रतिबंधित केलेल्या गुटखा, पानमसाला व सुगंधित तंबाखूच्या विक्री व साठवणुकीविरुद्ध बारामती शहर पोलीस स्टेशन व अन्न व औषध प्रशासन विभागाने संयुक्त कारवाई करून मोठा साठा जप्त केला आहे.
अन्न सुरक्षा अधिकारी श्री. संदीप दिगंबरराव शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बारामती शहर पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. २३३/२०२६ भारतीय न्याय संहिता कलम १२३, २२३, २७४, २७५ तसेच अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिनांक ०९/०६/२०२६ रोजी अन्न व औषध प्रशासनाचे अन्न सुरक्षा अधिकारी श्री. संदीप शिंदे, सहकारी अन्न सुरक्षा अधिकारी श्री. लक्ष्मीकांत सावळे व पंच यांच्या उपस्थितीत मे. धानेश्वरी किराणा अॅण्ड जनरल स्टोअर्स, शॉप नं. ८५, विश्व एम्पायर, भिगवण रोड, जळोची, बारामती येथे तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेला गुटखा, पानमसाला व सुगंधित तंबाखूचा मोठ्या प्रमाणात साठा आढळून आला.
सदर कारवाईत विविध ब्रँडचा गुटखा, पानमसाला व सुगंधित तंबाखू असा एकूण रु. ५५,२४४/- किंमतीचा प्रतिबंधित अन्नपदार्थाचा साठा जप्त करण्यात आला. जप्त करण्यात आलेल्या मालामध्ये प्रीमियम आर.एम.डी. पानमसाला, एम सेंटेड तंबाखू, डायरेक्टर पान मसाला, विमल पानमसाला, व्ही-१ तंबाखू, गुलाम गुटखा, बाजीगर गुटखा, के.आर.१000 गुटखा आदी उत्पादनांचा समावेश आहे.
चौकशीदरम्यान सदर दुकानाचे मालक व विक्रेते गणेश गुरुशांताप्पा गुरुभेट्टी (वय ३८ वर्षे, रा. बारामती) यांनी प्रतिबंधित अन्नपदार्थ कर्नाटक राज्यातून आणल्याचे सांगितले. मात्र त्याबाबत कोणतेही वैध खरेदी बिल अथवा कागदपत्र सादर करता आले नाही.
सार्वजनिक आरोग्यास गंभीर धोका निर्माण करणाऱ्या या प्रतिबंधित अन्नपदार्थांची पुनर्विक्री अथवा पुनर्वापर होऊ नये यासाठी संबंधित साठा जप्त करण्यात आला आहे.
गुन्ह्याच्या तपासात आरोपी गणेश गुरुशांताप्पा गुरुभेट्टी यास दिनांक १०/०६/२०२६ रोजी अटक करण्यात आलेली असून त्याच्याकडून प्रतिबंधित अन्नपदार्थांचा पुरवठादार, वाहतूकदार, वितरक व उत्पादक यांच्याबाबत सखोल चौकशी सुरू आहे.
सदर प्रकरणात केवळ किरकोळ विक्रीपुरता तपास मर्यादित न ठेवता प्रतिबंधित गुटखा व तंबाखूच्या राज्यातील चोरट्या व्यापाराची संपूर्ण पुरवठा साखळी उघड करण्याच्या दृष्टीने आर्थिक व्यवहार, वाहतूक व्यवस्था, पुरवठादार, वितरक व उत्पादक यांच्यापर्यंत तपास विस्तारित करण्यात आला आहे.
सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार श्री. रामचंद्र शिंदे, बक्कल क्र. २३0७, बारामती शहर पोलीस स्टेशन हे करीत असून तपास मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड व पोलीस निरीक्षक श्री. श्रीशैल चिवडशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.