अल्पवयीन मुलाच्या हत्येसाठी ५ लाखांची सुपारी, दोन पिस्तुलांसह कटाचा पर्दाफाश
शनिवार, १३ जून, २०२६
Edit
माळेगाव : मेडद गावात राजकीय वैमनस्यातून अल्पवयीन
मुलाच्या खुनाचा कट रचल्याचे धक्कादायक प्रकरण उघड झाले आहे. माळेगाव पोलीस
ठाण्याचे तपासी अधिकारी पीएसआय देविदास साळवे यांच्या तपासादरम्यान समोर
आलेल्या माहितीनुसार, सरपंच गणेश दत्तात्रय काशीद याने आपल्या प्रतिस्पर्धी
अर्जुन यादव याच्या मुलगा अभिजित अर्जुन यादव याचा खून करण्यासाठी योजना
आखली होती.
यासाठी काशीद याने सुजित नाळे यास तब्बल ५ लाख रुपये व दोन गावठी पिस्तुल दिल्याचे निष्पन्न झाले आहे. गणेश गावडे याने जमीन विकून मिळालेल्या ८ लाख रुपयांचा चेक मयुर मोरे यास दिला होता. हा चेक रोख करून त्यातील ३ लाख रुपये काशीद यास देण्यात आले तर उर्वरित ५ लाख रुपये सुजित नाळे यास दिले गेले. पैसे दिल्यानंतर नाळे यास दोन गावठी पिस्तुल देऊन “अभिजित यादव वाचता कामा नये” असे आदेश दिले गेले.
या कटामागे राजकीय वैमनस्य असल्याचे स्पष्ट झाले आहे. अल्पवयीन मुलाचा जीव घेण्यासाठी इतक्या मोठ्या प्रमाणात पैसा व शस्त्रे वापरल्याचे समोर आल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणात भारतीय न्याय संहिता अंतर्गत गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पीएसआय देविदास साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.