ठाकरेंची पाठ फिरताच यवतमाळ शिवसेनेत भूकंप! सभेनंतर १५ प्रमुख पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे
उद्धव ठाकरेंच्या सभेला उपस्थित असलेल्या आणि संजय देशमुख यांच्या कट्टर समर्थकांनीच सामूहिक राजीनामा दिल्याने ठाकरेंच्या मिशन यवतमाळला मोठा धक्का बसल्याचे बोलले जात आहे.
थेट जिल्हा संपर्कप्रमुखांकडे सोपवले पत्र
उद्धव ठाकरे यवतमाळचा दौरा आटपून परतताच या सर्व नाराज पदाधिकाऱ्यांनी आपले राजीनामे थेट जिल्हा संपर्कप्रमुखांकडे सुपूर्द केले. सादर केलेल्या राजीनामा पत्रात सर्व नेत्यांनी वैयक्तिक कारणास्तव राजीनामा देत असल्याचे म्हटले. मात्र या सामूहिक राजीनाम्यामागे आगामी निवडणूक कारणीभूत असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे.
राजीनामा देणाऱ्यांमध्ये राजेंद्र अजाबराव धोटे, गजानन रामकृष्ण पाटील, गणेश उकांडराव आगरे, अंजलीताई गिरी, प्रतिभाताई हरणखेडे, गिरिजानंद कळंबे, अक्षय ठाकरे, स्वप्निल खोब्रागडे आणि मंगेश चोपडे यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांचा यात समावेश आहे. हे सर्वजण खासदार संजय देशमुख यांचे विश्वासू मानले जातात.
आईची खोटी शपथ घेणारे आता सासरी सुखाने नांदतील- उद्धव ठाकरे
या राजीनामा नाट्यापूर्वी, शनिवारी यवतमाळ येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शिवसैनिकांचा मेळावा पार पडला. खासदार संजय देशमुख यांच्या बंडखोरीनंतर उद्धव ठाकरेंची यवतमाळमधील ही पहिलीच जाहीर सभा होती. या सभेत त्यांनी शिंदे गट आणि भाजपवर निशाणा साधला.
"ज्या माणसाला आपण रक्ताचे पाणी करून खासदार बनवले, त्याने या मातीशी आणि स्वतःच्या रक्ताशी बेईमानी केली. गद्दार अखेर गद्दारांच्याच कळपात सामील झाला. माझ्या शब्दावर विश्वास ठेवून तुम्ही त्याला मतदान केले होते, पण त्याने मतदारांच्याच पाठीत खंजीर खुपसला. आमदार फोडताना ५० खोके मोजले गेले, मग खासदारांचा भाव काय लागला असेल?" असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला.
"आईची खोटी शपथ घेऊन स्वतःचा स्वाभिमान विकणाऱ्यांना आता सासरी सुखाने नांदू द्या. इथे ते वाघासारखे जगत होते, तिथे ओझं वाहणाऱ्या गाढवासारखं जगतील. झाडाची पाने गळली तरी मूळ असणारे निष्ठावंत कार्यकर्ते आजही माझ्यासोबत खंबीरपणे उभे आहेत," असंही उद्धव ठाकरे म्हणाले.