पुन्हा एकदा नोटाबंदी? 30 जूननंतर 10, 20, 50, 100 च्या नोटा बंद होण्याचे वृत्त! बँक ऑफ महाराष्ट्राचा अत्यंत महत्त्वाचा खुलासा
सोमवार, २९ जून, २०२६
Edit
नवी दिल्ली: 2005 पूर्वी छापण्यात आलेल्या महात्मा गांधी मालिकेतील 10, 20, 50 आणि 100 च्या नोटा 30 जूननंतर बंद होणार का, असा प्रश्न अलीकडे सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका वृत्तामुळे उपस्थित झाला होता.
एका मीडिया रिपोर्टमध्ये बँक ऑफ महाराष्ट्रच्या कथित परिपत्रकाचा
हवाला देत, 30 जूननंतर अशा नोटा स्वीकारल्या जाणार नाहीत, असा दावा करण्यात
आला होता. या वृत्तामुळे पुन्हा एकदा नोटाबंदी होणार असल्याच्या चर्चांना
उधाण आले.
नेमका काय दावा करण्यात आला होता?
व्हायरल झालेल्या मीडिया रिपोर्टमध्ये असा दावा करण्यात आला होता की, बँक
ऑफ महाराष्ट्रने 2005 पूर्वी छापलेल्या 10, 20, 50 आणि 100 च्या नोटा 30
जूननंतर स्वीकारू नयेत, असे आदेश जारी केले आहेत. तसेच पुढील काळात इतर
बँकाही अशाच प्रकारचे निर्णय घेऊ शकतात, असेही त्यात म्हटले होते. मात्र
बँकेने स्वतःच या दाव्याचे खंडन केल्यामुळे या सर्व चर्चांना पूर्णविराम
मिळाला आहे.
याशिवाय भारतीय रिझर्व्ह बँकेकडून (RBI)
अशा प्रकारचा कोणताही आदेश जारी करण्यात आलेला नाही. त्यामुळे जुन्या
नोटांबाबत कोणताही संभ्रम बाळगण्याचे कारण नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
बँक ऑफ महाराष्ट्रने आपल्या अधिकृत फेसबुक पेजवर प्रसिद्ध केलेल्या
निवेदनात म्हटले आहे की, बँक ऑफ महाराष्ट्रच्या शाखांमध्ये 2005 पूर्वी
छापलेल्या 10, 20, 50 आणि 100 च्या नोटा 30 जूननंतर स्वीकारल्या जाणार
नाहीत, असा एक चुकीचा संदेश सोशल मीडियावर व्हायरल केला जात आहे. बँकेचे
स्पष्ट म्हणणे आहे की, ही बातमी पूर्णपणे खोटी आणि दिशाभूल करणारी आहे.
ग्राहकांनी अशा कोणत्याही संदेशांवर विश्वास ठेवू नये. तसेच असे संदेश पुढे
पाठवू नयेत. कोणतीही अधिकृत माहिती केवळ अधिकृत स्रोतांवरूनच घ्यावी.
रिझर्व्ह बँकेने यापूर्वी काय सांगितले होते?
रिझर्व्ह बँकेने 2016 मध्ये जारी केलेल्या एका आदेशात म्हटले होते की,
2005 पूर्वीच्या महात्मा गांधी मालिकेतील नोटांचे चलनातील प्रमाण हळूहळू
कमी झाले आहे. अशा नोटा बदलून घेण्याची सुविधा नागरिकांना उपलब्ध करून
देण्यात आली होती. मात्र त्याचवेळी रिझर्व्ह बँकेने स्पष्ट केले होते की,
या नोटा वैध राहतील आणि त्यांचे चलन बंद करण्यात आलेले नाही.
रिझर्व्ह बँक वेळोवेळी नवीन नोटांमध्ये अधिक सक्षम सुरक्षा वैशिष्ट्ये
(सिक्युरिटी फीचर्स) समाविष्ट करत आहे. जेणेकरून बनावट नोटांच्या समस्येवर
नियंत्रण ठेवता येईल. मात्र याचा अर्थ जुन्या नोटा चलनातून बाद करण्यात
आल्या आहेत किंवा त्या बंद करण्यात येणार आहेत, असा अजिबात होत नाही.
त्यामुळे 2005 पूर्वीच्या महात्मा गांधी मालिकेतील 10, 20, 50 आणि 100
च्या नोटा 30 जूननंतर स्वीकारल्या जाणार नाहीत, असा सोशल मीडियावर व्हायरल
होत असलेला संदेश पूर्णपणे खोटा असून त्यामध्ये कोणतेही तथ्य नसल्याचे बँक
ऑफ महाराष्ट्रने स्पष्ट केले आहे.