मराठा समाजासाठी फडणवीस सरकारचा महत्वाचा निर्णय; मराठा समाजाला इतर मागासवर्गीयांप्रमाणे ८ सवलती लागू

मराठा समाजासाठी फडणवीस सरकारचा महत्वाचा निर्णय; मराठा समाजाला इतर मागासवर्गीयांप्रमाणे ८ सवलती लागू

 

मुंबई: मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या उपोषण आंदोलनानंतर मराठा समाजालतील विद्यार्थ्यांना इतर मागासवर्गीयांप्रमाणेच सर्व शैक्षणिक व योजना लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आल आहे. याविषयीचा शासन निर्णय जारी करण्यात आला असून यामुळे मराठा समाजातील विद्यार्थी देखील शैक्षणिक सवलती व सोयीसुविधांनासाठी पात्र ठरणार आहेत. २०२६-२७ या चालू शैक्षणिक वर्षापासूनच या योजनांचा लाभ मराठा समाजाला दिला जाणार आहे.

मराठा समाजातील विद्यार्थ्यांना देखील इतर मागास प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांप्रमाणे सर्व शैक्षणिक सवलती आणि योजनांचा लाभ मिळावा अशी मागणी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी केली होती. मराठा आरक्षण उपसमितीच्या बैठकीत चर्चा झाल्यानंतर मराठा समाजाला शैक्षणिक सवलती योजनांचा लाभ देण्यास येणाऱ्या अडचणींवर चर्चा करण्यात आली. त्यावेळी यासाठी निधीची स्वतंत्र तरतूद करणे, महाडीबीटी पोर्टलवर आवश्यक ते तांत्रिक बदल करण्याची आवश्यकता असल्याचे समोर आले.

तसेच सर्व विभागांना याबाबतचे निर्देश देण्याचीही आवश्यकता असल्याने सामान्य प्रशासन विभागाने आज याबाबतचे आदेश जारी केले. त्यानुसार मराठा विद्यार्थ्यांना सर्व सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी शालेय शिक्षण व क्रिडा विभाग , उच्च व तंत्र शिक्षण विभाग , वैद्यकीय शिक्षण विभाग , कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय व मत्स्यव्यवसाय विकास विभाग, कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विकास विभाग या विभागांच्या शैक्षणिक योजना, सवलती लागू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

भविष्यात इतर मागास प्रवर्गास ज्या काही नवीन शैक्षणिक सवलती व सोयीसुविधा लागू करण्यात येतील, त्या सर्व सवलती पुढील कोणत्याही नवीन आदेशाची वाट न पाहता मराठा समाजास आपोआप लागू होतील, अशी अत्यंत महत्त्वाची तरतूदही या निर्णयात करण्यात आली आहे. या सवलती लागू करण्याबाबत कोणती कार्यवाही संबंधित विभागाकडून करण्यात आली याचा अहवालही मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीला द्यावा लागणार आहे.

मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना या सवलती मिळणार

शालांत परिक्षोत्तर शिष्यवृत्ती : दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर पुढील उच्च शिक्षणासाठी ओबीसी विद्यार्थ्यांना मिळणारी शालांत परिक्षोत्तर शिष्यवृत्ती योजना.

वाहन चालक व वाहक प्रशिक्षण : सारथी संस्थेमार्फत मराठा समाजातील तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी विशेष मोटार वाहन चालक व वाहक प्रशिक्षण योजना सुरू करण्यात येईल.

माध्यमिक व उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती : इयत्ता ९ वी ते १२ वीच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक वर्गातील विद्यार्थ्यांना लागू असलेली विशेष शिष्यवृत्ती योजना.

शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती : इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांना लागू असलेल्या इतर १६ बाबींबाबतच्या शैक्षणिक शुल्काची प्रतिपूर्ती थेट शासनाकडून करण्याची योजना.

परराज्यातील शिक्षणासाठी सवलत : महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असणारे, परंतु परराज्यात अनुदानित व विनाअनुदानित व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलत

व्यावसायिक प्रशिक्षण शुल्क प्रतिपूर्ती : शासकीय औदयोगिक प्रशिक्षण संस्थामधील पीपीपी योजनेंतर्गत उपलब्ध जागांवर तसेच खाजगी औदयोगिक प्रशिक्षण संस्थामध्ये प्रवेश घेतलेल्या उमेदवारांसाठीची व्यावसायिक प्रशिक्षण शुल्क प्रतिपूर्ती

योजनारिक्त जागांवर प्रवेश घेणाऱ्यांनाही लाभ : केंद्रीयभूत प्रवेश प्रक्रिया (कॅप) पूर्ण झाल्यानंतर महाविद्यालयांमध्ये रिक्त राहिलेल्या जागांवर, प्रवेश नियंत्रण समितीने मान्यता दिलेल्या संस्थास्तरावरील जागांवर प्रवेश घेतलेल्या मराठा विद्यार्थ्यांनाही इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांप्रमाणेच सर्व शैक्षणिक सवलती लागू करण्यात येणार आहेत.