“पुढील १ हजार वर्षांचे भविष्य घडवण्यावर काम करतोय, भारत उतावीळपणे निर्णय घेत नाही”: पंतप्रधान नरेंद्र मोदी

“पुढील १ हजार वर्षांचे भविष्य घडवण्यावर काम करतोय, भारत उतावीळपणे निर्णय घेत नाही”: पंतप्रधान नरेंद्र मोदी

 


नवी दिल्ली: भारताचे वैशिष्ट्य असे आहे की, घाई करणारा देश नाही. आपण एक असे राष्ट्र आहोत ज्याने विकास आणि विनाश दोन्ही पाहिले आणि सहन केले आहेत. भारताच्या चिंतनात युगांची स्मृती रुजलेली आहे. भारत जे काही करत आहे, त्यामागे पुढील १ हजार वर्षांचा विचार आहे. भारत एक हजार वर्षांचे भविष्य लिहिणार आहे. हीच भारताची जगाला दिलेली सर्वात मोठी हमी आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान मोदी यांनी केले. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका परिषदेला संबोधित केले. पंतप्रधान मोदींचे हे विधान अशा वेळी आले आहे, जेव्हा गेल्या अनेक महिन्यांपासून पश्चिम आशिया अशांततेच्या स्थितीत आहे. भारत केवळ एक वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था नाही, तर एक विश्वसनीय आणि विश्वासार्ह जागतिक शक्ती आहे. या वेगवान विकासाबरोबरच आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची विश्वासार्हताही सातत्याने वाढत आहे. जी-७ शिखर परिषदेतून नुकत्याच परतल्यानंतर मला असे आढळून आले की, जगभरातील नेते आणि राष्ट्रे मान्य करतात आणि कौतुक करतात की, 'राष्ट्र प्रथम' हे भारताचे मार्गदर्शक तत्त्व आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी नमूद केले. 

देशातील जनतेने 'राष्ट्र प्रथम' प्रमाणे कर्तव्ये पार पाडली

भारताची वाढती ताकद ही एक विश्वसनीय शक्ती आहे. आजच्या भारतासाठी 'राष्ट्र प्रथम' हा सर्वांत मोठा मंत्र, सर्वांत मोठे तत्व आहे. काही दिवसांपूर्वीच आमच्या सरकारने सत्तेत १२ वर्षे पूर्ण केली. गेल्या १२ वर्षांतील देशाच्या कामगिरीचे मोजमाप केले, तर तुमच्या लक्षात येईल की 'राष्ट्र प्रथम' ही भावना प्रत्येक निर्णयाच्या, प्रत्येक पावलाच्या, प्रत्येक प्रयत्नाच्या केंद्रस्थानी आहे. स्वच्छ भारत अभियानापासून ते 'मेक इन इंडिया', खादी आणि स्थानिक वस्तू खरेदी करण्यावर दिलेला भर, हे सर्व उपक्रम यशस्वी झाले. कारण देशातील जनतेने देशाला प्रथम स्थान देऊन आपली कर्तव्ये पार पाडली. यासाठी मी या देशाच्या नागरिकांना सलाम करतो, असेही पंतप्रधान म्हणाले.

दरम्यान, 'राष्ट्र प्रथम' या तत्त्वाचा सरकारी धोरणांवर आणि निर्णय प्रक्रियेवर खोलवर परिणाम झाला आहे; याचे उत्तम उदाहरण म्हणजे आपल्या आदिवासी भागांचे परिवर्तन. अनेक दशकांपासून हे भाग माओवादी दहशतवादाने ग्रासले होते, ज्यामुळे २१ व्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत मूलभूत सरकारी सेवांच्या वितरणात अडथळा निर्माण झाला होता. अनेक सरकारे आणि पिढ्या उलटून गेल्या, तरीही स्थानिक लोकांची आशा अपूर्णच राहिली. आज या भागांमधून माओवाद, दहशतवाद पूर्णपणे संपुष्टात आला आहे, ही एक उल्लेखनीय कामगिरी असून, याला कमी लेखता येणार नाही, असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे.