...तर ५ जुलैपासून उपोषण करणार; अण्णा हजारेंचा इशारा
मुंबई: माहिती अधिकार कायद्यात राज्याने गत १२ जून रोजी केलेल्या दुरुस्त्या लोकशाही विरोधी असल्याने त्या रद्द करण्याच्या मागणीसाठी ५ जुलैपासून राळेगणसिद्धी येथील यादव बाबा मंदिरात उपोषण करण्याचा इशारा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविलेल्या पत्रात दिला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविलेल्या पत्रात अण्णा हजारे यांनी म्हटले आहे की, राज्य सरकारच्या या आदेशाचा देशातील माहिती अधिकार चळवळीवर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो. कारण या आदेशातील नव्या नियमांमुळे माहिती मिळविणे अधिक कठीण, खर्चिक आणि निर्बंधित होणार आहे. माहिती अधिकाराच्या उद्देशालाच यामुळे हरताळ फासला जाईल. हे लोकशाही प्रक्रियेच्या विरोधात आहे. माहितीचा अधिकार हा शासनाने केलेला जनतेवर केलेला उपकार नसून नागरिकांचा घटनात्मक अधिकार आहे.
अधिकारी मालक झाले आहेत का?
जनता मालक आहे, तर अधिकारी सेवक. अधिकाऱ्यांनी सेवक म्हणून काम करावे. परंतु, माहिती लपवून अधिकारी मालक झाले आहेत. त्यामुळे आंदोलन करण्याचे ठरवले आहे, असे अण्णा हजारे यांनी स्पष्ट केले. तसेच लोकशाही व्यवस्थेत नियम तयार करताना व्यापक सार्वजनिक चर्चा, सूचना व हरकती मागवणे अपेक्षित असते. परंतु या दुरुस्त्यांबाबत कोणतीही व्यापक चर्चा झाल्याचे दिसत नाही, असा दावा करत, सरकारने प्रशासनात पारदर्शकता आणण्यासाठी प्रत्येक विभाग ऑनलाइन करायला हवा होता. माहितीचा अधिकार कलम ४ मधील १७मुद्दे आज कोणत्याही कार्यालयामध्ये पाहायला मिळत नाहीत. १२ जून रोजी माहिती अधिकार कायद्यात दुरुस्त्या करण्यापूर्वी जनतेच्या हरकती घेणे आवश्यक होते. परंतु त्या का घेण्यात आल्या नाहीत, असा सवाल अण्णा हजारे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषेदत केला.
दरम्यान, बुधवारी राज्याचे माहिती आयुक्त राहुल पांडे राळेगणसिद्धीत येणार आहेत. पांडे यांनी सोमवारी दुपारी फोनवर हजारे यांच्याशी चर्चा केली. बुधवारी ते सविस्तर चर्चेसाठी येणार आहेत. माहिती अधिकार कायद्यासाठी अण्णा हजारे यांनी महाराष्ट्रभर जनजागृती दौरे करून २००३ मध्ये मुंबईतील आझाद मैदानात, २००४ मध्ये राळेगणसिद्धी येथे व २००६ मध्ये केंद्रीय माहितीचा अधिकार कायद्यासाठी आळंदीत उपोषण केले होते.