कोर्ट घरात भरतं का, आम्हाला काय शिकवता?; ओमराजेंवर राऊतांचा संताप, संजय दिना पाटलांनाही सुनावलं

कोर्ट घरात भरतं का, आम्हाला काय शिकवता?; ओमराजेंवर राऊतांचा संताप, संजय दिना पाटलांनाही सुनावलं

 


मुंबई: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील खासदारांच्या फुटीवरुन पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापलं आहे. धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी आपल्या वडिलांशी संबंधित खटल्याचा निकाल लागल्यानंतरच आपण भूमिका स्पष्ट करू, असे वक्तव्य केले होते. त्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ओमराजे निंबाळकर यांच्यावर जोरदार टीका केली आहे. याचवेळी त्यांनी मुंबई उत्तर-पूर्वचे खासदार संजय दिना पाटील यांच्यावरही निशाणा साधला.

ठाकरे गटातील काही खासदारांनी पक्षाची साथ सोडल्याची चर्चा सुरू असताना, ओमराजे निंबाळकर यांच्या भूमिकेबाबतही विविध तर्क लावले जात आहेत. या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना त्यांच्या भूमिकेविषयी नाराजी व्यक्त केली.

"कोर्ट घरात भरतं का?"

ओमराजे निंबाळकर यांनी वडिलांच्या खटल्याच्या निकालानंतर भूमिका स्पष्ट करणार असल्याचे म्हटल्याबाबत विचारले असता संजय राऊत म्हणाले, "ज्या पक्षाने तुम्हाला एकदा आमदार आणि दोन वेळा खासदार केलं, त्या पक्षावर संकट आलं असताना तुम्ही किमान चार तास तरी काढायला हवे होते. कोर्ट घरात भरतं का? कोर्ट पुण्यात भरत नाही. आम्हाला काय शिकवता?"

दिल्ली बैठकीला गैरहजर राहिल्याचा ठपका

व्हीप बजावल्यानंतर शिवसेनेच्या महत्त्वाच्या बैठकीसाठी नऊपैकी केवळ तीनच खासदार दिल्लीत हजर होते. या बैठकीला ओमराजे निंबाळकर आणि संजय दिना पाटील उपस्थित राहण्याची अपेक्षा होती.

संजय दिना पाटलांवरही निशाणा

याचवेळी संजय राऊत यांनी खासदार संजय दिना पाटील यांच्यावरही थेट टीका केली. संजय दिना पाटील हे शिवसेनेच्या बळावर निवडून आले आणि त्यांना पक्ष सोडण्याचे कोणतेही कारण नव्हते. "संजय दिना पाटील हे शिवसेनेमुळे जिंकले. खरं तर त्यांना जायचं काहीच कारण नव्हतं. निष्ठावंत महिला कार्यकर्त्यांना डावलून हट्टापायी त्यांच्या मुलीला नगरसेविकेचे तिकीट देण्यात आले. त्यावेळी सगळ्यांचा विरोध होता," असा दावा राऊत यांनी केला.

"मुलीला विचारा वडिलांची भूमिका"

संजय दिना पाटील यांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करताना राऊत पुढे म्हणाले की, "मुलीला वडिलांची भूमिका काय आहे ते विचारा. पक्षाने इतकं दिलं, तरी पक्ष संकटात असताना त्यांनी काय भूमिका घेतली? ते दिल्लीला का आले नाहीत, आम्ही त्यांची वाट बघत होतो. आम्हाला खात्री होती की ते येतील. त्यांना तिथे यावं असं का वाटलं नाही. पक्ष संकटात असताना ज्यांना तिथे यावं वाटलं नाही त्यांनी आता अकलेचे तारे तोडू नयेत, असं संजय राऊत म्हणाले.