खडकवासला साखळीत केवळ २० टक्के पाणीसाठा; पुण्यात कपातीचा निर्णय आज?
सोमवार, ८ जून, २०२६
Edit
पुणे : खडकवासला धरण साखळीतील पाणीसाठा झपाट्याने घटल्याने शहराच्या पाणी नियोजनासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. उपलब्ध पाणीसाठा आणि मान्सूनच्या अनिश्चिततेचा आढावा घेण्यासाठी सोमवारी महापालिका प्रशासनाची उच्चस्तरीय बैठक होणार आहे. पाणी वापरावर निर्बंध घालण्यासंदर्भातील विविध पर्यायांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. त्यामध्ये दिवसाआड पाणीपुरवठ्याचाही पर्याय विचाराधीन असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
पाटबंधारे विभागाच्या आकडेवारीनुसार, खडकवासला धरण
समूहाची एकूण साठवण क्षमता २९.१५ टीएमसी आहे. सध्या धरणांमध्ये ५.८७५
टीएमसी इतकाच पाणीसाठा उपलब्ध असून, तो एकूण क्षमतेच्या सुमारे २० टक्के
आहे. शहराची दररोजची पाण्याची गरज जवळपास १,५०० एमएलडी इतकी असल्याने
उर्वरित काळासाठी उपलब्ध साठ्याचे काटेकोर नियोजन करावे लागणार आहे.
प्रशासनाकडून नागरिकांना पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन करण्यात
येत आहे. सोमवारी होणाऱ्या बैठकीत धरणांतील उपलब्ध साठा, हवामानाचा अंदाज
आणि शहराची मागणी यांचा विचार करून पुढील धोरण निश्चित केले जाणार असल्याचे
समजते.