मूल होत नव्हतं म्हणून दुसऱ्याचं बाळ पळवलं; पुणे रेल्वे स्थानकावरील घटना, तिघांना अटक!
पुणे: मूल होत नसल्याच्या कारणातून एका जोडप्याने थेट पुणे रेल्वे स्थानकावर झोपलेल्या महिलेच्या एक वर्षाच्या चिमुकलीचे अपहरण केल्याची धक्कादायक घटना समोर आली. मात्र बंडगार्डन पोलिसांनी तत्परता दाखवत अवघ्या काही तासांत बाळाचा शोध घेऊन तिला सुरक्षितपणे आईच्या स्वाधीन केले. या प्रकरणात नवरा-बायकोसह तिघांना अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिरूर तालुक्यातील मलठण येथील शिवानी अमोल भोसले (वय, २१) या महिलेचे पतीसोबत भांडण झाल्याने त्या शनिवारी सायंकाळी सहा वाजता एक वर्षाच्या मुलीसह पुणे रेल्वे स्थानकावर आल्या होत्या. रात्री झाल्याने त्या रेल्वे स्टेशन परिसरातील दत्त मंदिराजवळील मोकळ्या जागेत मुलीसह झोपी गेल्या. रात्री साडेनऊच्या सुमारास शिवानी यांना जाग आली असता त्यांच्या शेजारी झोपलेली चिमुकली मुलगी गायब असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी रेल्वे स्थानक परिसरात मुलीचा शोध घेतला, मात्र ती सापडली नाही. अखेर त्यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात धाव घेत मुलीच्या अपहरणाची तक्रार दाखल केली.
तक्रार मिळताच पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. रेल्वे स्थानक परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता दोन महिला आणि एक पुरुष एका लहान मुलीला घेऊन जात असल्याचे स्पष्ट दिसून आले. पुढील तपासात हे तिघे संशयित पनवेल-नांदेड एक्स्प्रेसमध्ये बसल्याचेही समोर आले. यानंतर पोलिसांनी तातडीने दोन पथके तयार केली. एक पथक दौंडकडे तर दुसरे कुर्डूवाडीकडे रवाना करण्यात आले. दौंड रेल्वे स्थानक परिसरात शोधमोहीम राबवत असताना पोलिसांना संशयित तिघे एका ठिकाणी बसलेले आढळले. त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांची ओळख द्रुपदा लक्ष्मण गायकवाड (वय ३५), राधा लकी आदिवासी (वय,२०) आणि लकी संदीप आदिवासी (वय, २१) अशी झाली.
पोलिसी चौकशीत राधा आणि लकी या दाम्पत्याने मूल होत नसल्यामुळे पुणे रेल्वे स्थानकावर झोपलेल्या महिलेच्या मुलीचे अपहरण केल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी चिमुकलीची सुखरूप सुटका करून तिला आईच्या स्वाधीन केले तसेच तिघांनाही अटक केली. ही संपूर्ण कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजीत चौगुले तसेच पोलीस कर्मचारी प्रकाश आव्हाड, महेश जाधव, ज्ञानेश्वर बडे, ज्ञानेश्वर गायकवाड आणि त्यांच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली.