बारामतीच्या साठवण तलावांतून हजारो लिटर पाण्याची गळती; प्रशासनाचे दुर्लक्ष; नागरिकांमध्ये संताप
बारामती: बारामती शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या साठवण तलावांमधून मोठ्या प्रमाणावर पाण्याची गळती होत असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. एकीकडे शहरात सध्या दोन दिवसाआड पाणीपुरवठा होत असताना हजारो लिटर पाणी वाया जात असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. नगरसेवक अमर धुमाळ आणि समीर चव्हाण यांनी हे वास्तव समोर आणलं असून प्रशासन नेमकं काय करतंय असा सवाल आता उपस्थित होत आहे.
बारामतीकरांच्या पाणीपुरवठ्याची सोय व्हावी यासाठी स्व. अजितदादा पवार यांच्या दूरदृष्टीतून विविध भागांत साठवण तलावांची उभारणी करण्यात आली आहे. मात्र, जलशुद्धीकरण केंद्राशेजारील १२८ MLT क्षमतेच्या तलावासह जळोची येथील २२२ MLT क्षमतेच्या साठवण तलावातून मोठ्या प्रमाणात गळती होत असल्याचं समोर आलं आहे. या गळतीमुळे मोठ्या प्रमाणावर पाणी ओढ्याकडे वाहून जात असल्याचं निष्पन्न झालं आहे.
दरम्यान, पाणीपुरवठा सभापती समीर चव्हाण आणि बांधकाम सभापती अमर धुमाळ यांनी संबंधित ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी केली. पाहणीदरम्यान मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. या संपूर्ण प्रकरणात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने दुर्लक्ष केल्याचा आरोप करण्यात येत आहे. संबंधित पाणीपुरवठा प्रकल्प २०२३ मध्ये पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, अद्यापही अनेक कामे अपूर्ण असल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे.
याशिवाय, सार्वजनिक बांधकाम विभागाकडून रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात येत असताना, त्यानंतर लगेचच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून त्याच रस्त्यांचे खोदकाम करून पाणीवाहिन्या टाकल्या जात असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि नगरपालिका यांच्यात समन्वयाचा अभाव असल्याची टीका होत आहे.
दरम्यान, बारामती शहरात सध्या नीरा डाव्या कालव्याचे आवर्तन बंद झाल्यामुळे दोन दिवसाआड पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. अशात बारामतीला कित्येक महीने नियमित पाणीपुरवठा करण्याची क्षमता असलेल्या साठवण तलावांमधून मोठ्या प्रमाणात पाणी गळती होत असल्याचं सत्य समोर आलं आहे. त्यामुळे आता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण नेमकं करतंय असाच प्रश्न उपस्थित होत आहे.