'सोशल मीडिया'वर नसलेल्या आमदारांना मुख्यमंत्र्यांचा दम; लेखाजोखाच आमदारांच्या हातात ठेवला
भाजपच्या आमदारांची बैठक वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांनी सोमवारी रात्री घेतली. सोशल मीडियावर आमदार किती सक्रिय आहेत. केंद्र व राज्य सरकारच्या विविध निर्णयांची माहिती ते सोशल मीडियावर टाकतात का, मतदारांशी किती संपर्कात असतात, पंतप्रधान मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या एक्स पोस्ट ते किती प्रमाणात रिपोस्ट करतात, या सगळ्या गोष्टींचा लेखाजोखाच कालच्या बैठकीत त्यांनी आमदारांच्या हातात ठेवला.
एसआयआर गांभीर्याने घ्या
एसआयआर म्हणजे मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रमात आमदारांनी जातीने लक्ष घालणे आवश्यक आहे. एकदा एसआयआर झाले, तर तुमच्या हाती काहीही नसेल. आताच बारीक नजर ठेवा, गाफील राहिलात नुकसान होईल. एसआयआरमध्ये सरकारी यंत्रणेला आपल्याला सहकार्य करायचे आहे, दबाव टाकून बदल करवून घेणे अजिबात अपेक्षित नाही. मात्र, त्याचवेळी दुबार नावे, मृत व्यक्तींची नावे राहणार नाहीत हेही जातीने बघा, असे मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिली.
कनेक्ट होण्याचा सर्वांत प्रभावी मार्ग
सोशल मीडिया हा प्रसिद्धीचा फार्स नाही आणि फार्स म्हणून तुम्ही सक्रिय असणे अपेक्षितही नाही. लाखो सर्वसामान्य माणसे आज सोशल मीडियाचा वापर करतात, त्यांच्याशी कनेक्ट होण्याचा तो सर्वांत प्रभावी मार्ग आहे आणि त्याचाच वापर केला जाणार नसेल तर ही बाब अतिशय गंभीर आहे. केंद्रीय भाजपनेही लोकप्रतिनिधींनी सोशल मीडियावर अतिशय सक्रिय राहण्याच्या सूचना अनेकदा दिलेल्या आहेत. तरीही त्याची दखल गांभीर्याने घेतली जाणार नसेल तर ते यापुढे खपवून घेतले जाणार नाही, असेही फडणवीस यांनी या बैठकीत सुनावले.