जेजुरी येथे दारू पिऊन भाविकांचा राडा;स्थानिक जखमी
बुधवार, १७ जून, २०२६
Edit
जेजुरी: सोमवती यात्रेनिमित्त कल्याण तालुक्यातून काही
भाविक जेजुरीत देवदर्शनासाठी आले होते. ते जेजुरी गडाच्या पायथ्याशी
असणाऱ्या गोडसे हॉल येथे उतरले होते. काही भाविकांनी तिथे दारू पार्टी
केली. पार्टी दरम्यानच भांडण सुरू झाले. हॉलचे मालक गोडसे हे भांडण
सोडविण्यासाठी गेले असता त्यांनाही बेदम मारहाण केली.
यामध्ये
हनुमंत शंकर गोडसे, प्रवीण हनुमंत गोडसे, राहुल पांडुरंग गोडसे, धनंजय
प्रकाश गोडसे, हरिभाऊ शंकर गोडसे, शीतल धनंजय गोडसे, संजय ज्ञानेश्वर तांबे
(सर्व रा. चिंचेची बाग, जेजुरी) आदी जखमी झाले आहेत.
ठाणे जिल्ह्यातून ३० ते ३५ भाविक जेजुरी येथे सोमवती यात्रेसाठी आले होते. दुपारी तीनच्या सुमारास काही भाविकांनी नशापान केले. त्यामुळे त्यांच्यात भांडणे सुरू झाली. भांडण वाढत असल्याने हॉलचे मालक राहुल गोडसे आणि त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींनी भांडण सोडविण्याचा प्रयत्न केला. मात्र, भाविकांनी त्यांना दगड आणि दांडक्यांनी मारहाण केली. मारहाणीनंतर भाविक पळून जात असताना स्थानिकांनी जेजुरी पोलिस ठाण्याशी संपर्क साधला. पळून जाणाऱ्यांना स्थानिकांनी अडविण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी दगडफेक केली, त्यामुळे स्थानिकही जखमी झाले.
शहरातील नागरिकांत प्रचंड संताप
गेल्या महिनाभरात
जेजुरीत येणाऱ्या भाविकांकडून स्थानिकांना मारहाण करण्याचे दोन-तीन प्रकार
झाले आहेत. घटनास्थळी दारूच्या बाटल्यांचे बॉक्स, रिकाम्या बाटल्यांचा खच
सापडलेला होता. यामुळे जेजुरीकरांत प्रचंड संताप आहे. देव दर्शनासाठी
येणारे भाविक दारू पिऊन डीजे व वाद्याच्या तालावर धिंगाणा घालतात, त्यामुळे
सामाजिक सलोखा बिघडत आहे. ग्रामस्थांनी या दोन्ही प्रवृत्तींवर जेजुरी
पोलिसांकडून बंदी आणावी, अशी मागणी केली आहे.