जागतिक दर्जाचा मीडिया हब उभारणार: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जागतिक दर्जाचा मीडिया हब उभारणार: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 


मुंबई : मालाड, मुंबई येथील आकाशवाणीच्या जागेवर जागतिक दर्जाचा ‘एकात्मिक चित्रपट आणि दूरदर्शन मीडिया हब’ उभारण्यासाठी राज्य शासन आणि प्रसार भारती यांनी संयुक्तपणे विशेष उद्देश कंपनी स्थापन करण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी मान्यता दिली.

प्रसार भारतीसमवेत झालेल्या सामंजस्य करारासंदर्भात फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा निवासस्थानी बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. सांस्कृतिक कार्य विभागाचे मंत्री ॲड. आशिष शेलार, प्रसार भारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव द्विवेदी आदी यावेळी उपस्थित होते.

फडणवीस यांनी सांगितले की, सध्या या जागेवर एनडीझेड आणि सीआरझेडचे नियम लागू असल्याने केवळ मर्यादित क्षेत्रावर विकास शक्य आहे. संपूर्ण विकास करण्यासाठी आवश्यक वैधानिक परवानग्या, नियमांमधील बदल आणि विकास नियंत्रण नियमावलीतील सुधारणा कराव्या लागणार आहेत. यासंदर्भात राज्य शासनाकडून आवश्यक ते सर्व सहकार्य उपलब्ध करून दिले जाईल. 

राज्याचे ‘क्वांटम व ‘डीप टेक’ धोरण लवकरच

राज्याच्या पहिल्या ‘महाराष्ट्र क्वांटम धोरण’ आणि ‘महाराष्ट्र डीप टेक धोरण’ यांना मान्यता दिली असून संपूर्ण डीप टेक परिसंस्थेसाठी व्यापक धोरण राबविणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

आगामी मंत्रिमंडळ बैठकीत या दोन्ही धोरणांना अंतिम मंजुरी दिली जाणार आहे. फडणवीस म्हणाले की, राज्यात संशोधन, नवोन्मेष, गुंतवणूक आणि उच्च कौशल्याधारित रोजगार निर्मितीला चालना देण्यासाठी ही दोन्ही धोरणे महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. 

महाराष्ट्राला जागतिक तंत्रज्ञान केंद्र म्हणून विकसित करण्याच्या राज्य शासनाच्या व्यापक दृष्टिकोनाचा हा भाग आहे. या दोन्ही धोरणांच्या अंमलबजावणीमुळे महाराष्ट्रात उच्च तंत्रज्ञान क्षेत्रातील गुंतवणूक, संशोधन, नवोन्मेष आणि रोजगारनिर्मितीला मोठी चालना मिळेल.