तुकाराम मुंढेंचा आता गुटखा माफियांवर वार; मध्य प्रदेशमधून महाराष्ट्रात गुटखा तस्करी
अकोला : अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी भेसळयुक्त खाद्यपदार्थांविरोधात तीव्र मोहीम राबवली. आता त्यांनी प्रतिबंधित गुटख्याच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे.
तुकाराम मुंढेंनी गुटखा माफियांवर वार करण्यास सुरुवात केली. मध्य प्रदेशमधून महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात गुटखा तस्करी होते. याच पार्श्वभूमीवर ’एफडीए’ने कारवाई करून लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईमुळे गुटखा माफियांमध्ये खळबळ उडाली.
प्रतिबंधित अन्न पदार्थ विक्री विरुद्ध धडक मोहीम
अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित अन्न पदार्थ विक्री विरुद्ध धडक मोहीम राबविण्यात येत आहे. गुटखा, पानमसाला, सुगंधित तंबाखू, सुपारी व तत्सम तंबाखूजन्य पदार्थाच्या उत्पादन, साठा, वितरण व विक्री यावर सार्वजनिक आरोग्याच्या हितासाठी प्रतिबंध घालण्यात आला आहे. या मोहिमेंतर्गत अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अकोला पथकाला गुटखा तस्करी केली जात असल्याची गुप्त माहिती मिळाली.
सापळा रचून गुटखा माफियांवर कारवाई
तेल्हारा शहरात एक चार चाकी वाहन प्रतिबंधित अन्न पदार्थाचा साठा विक्रीसाठी घेऊन येत होता. तेल्हारा पोलीस ठाण्याच्या हद्दीत माळेगाव ते तेल्हारा मार्गावर पथकाने सापळा रचला. माहिती प्रमाणे एका चार चाकी वाहनाला थांबवून तपासणी केली. त्यामध्ये सहा लाख १९ हजार ४८४ रुपये किंमतीचा गुटखा पान मसाला साठा आढळून आला. वाहन चालक देवीलाल सज्जनलाल जैसवाल (वय ३३ वर्षे रा. लाडणापुर ता. संग्रामपूर जि. बुलढाणा) व इतर दोन यांचे विरुद्ध कारवाई करण्यात आली. तेल्हारा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम २२३, २७४, २७५, १२३ व अन्न सुरक्षा मानदे कायद्याच्या कलम ५९ नुसार आरोपींविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.
११.१९ लाखांचा मुद्देमाल जप्त
प्रतिबंधित अन्नपदार्थ वाहतुकीसाठी वापरण्यात आलेले वाहन (एमएच ४० एसी ५०४७) अंदाजे किंमत पाच लाख रुपये व गुटखा साठा असा एकूण ११ लाख १९ हजार ४८४ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई सहाय्यक आयुक्त (अन्न) दे. गो. वीर यांचे मार्गदर्शनाखाली कार्यालयाचे अन्न सुरक्षा अधिकारी र. द्या. सोळंके, कि. ह. बोरचाटे व अन्न सुरक्षा अधिकारी (दक्षता) सं. ए. सुर्यवंशी यांनी केली. गुटखा, पानमसाला प्रतिबंधित अन्न पदार्थ विक्री करणाऱ्याविरुद्ध प्रशासनातर्फे नियमित कठोर कारवाई केली जाणार आहे.