'कागदावर लिहिलेलं मराठी वाचता येत नाही का?'; आशाताईंच्या शोकप्रस्तावावरून राज ठाकरेंची विधानसभा अध्यक्षांवर टीका
"विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी ज्या पद्धतीने मराठी भाषेची चिरफाड केली आणि कागदावर लिहून दिलेलं मराठी पण त्यांना वाचता येत नाही हे पाहून संताप, उद्वेग दोन्ही दाटून आला. वाचण्या आधी त्या कागदातून भेळ खाल्ली होती का यांनी?, अशी टीका राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये केली आहे. नार्वेकरांनी हा प्रस्ताव स्वाहिली अथवा हिब्रू भाषेत मांडला असता तरी चाललं असतं, कारण त्यांचं मराठी पण कळलं नाही आणि स्वाहिली, हिब्रू तसं पण कोणालाच कळत नाही, असेही या पोस्टमध्ये म्हटले आहे.
शोकप्रस्तावादरम्यान झालेल्या चुकांवर बोट ठेवत राज ठाकरेंनी पुढे लिहिले की, "अजून एक शोकांतिका म्हणजे नार्वेकर, दीनानाथ मंगेशकरांचा उल्लेख 'दीनदयाल मंगेशकर' करत होते आणि वाट्टेल तसं मराठी वाचून दाखवत होते. त्यावेळेस सभागृहात उपस्थित एकाही आमदाराला आक्षेप नोंदवावासा वाटला नाही. नार्वेकरांना ना दीनानाथ मंगेशकर माहित आहेत ना दीनदयाळ उपाध्याय माहित आहेत. भाजपची खोगीरभरती पाहता 'तेलही गेलं, तूपही गेलं, हाती आलं धुपाटणे' अशी अवस्था झाली आहे, असा टोला या पोस्टमध्ये लगावला आहे.
मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदेंवरही टीका
या प्रकरणी राज ठाकरेंनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही जोरदार टीका केली."गुलाबी आंखे जो तेरी देखी सारखी अनेक गाणी म्हणणाऱ्या फडणवीसांना आज आपल्या राज्यात विधानसभेत कोणत्या महान व्यक्तीला आपण श्रद्धांजली अर्पण करणार आहोत आणि त्याचं गांभीर्य काय असतं हे समजायला हवं होतं! पण त्यांचं म्हणणं सोपं आहे, सांगितलेली फोडाफोडीची कामं होत आहेत ना बरोबर, अधिवेशनाचा उपचार पूर्ण होत आहे ना? बस झालं. दीनदयाल मंगेशकर म्हणो की दीनानाथ चौहान म्हणो काय फरक पडतो, अशी टीका फडणवीस यांच्यावर ठाकरे यांनी केली.
"एकनाथ शिंदेंना पण याच्याशी घेणंदेणं असण्याचं काहीच कारण नाही. मराठी भाषेबद्दलच्या अभ्यासाचं त्यांचं विमान पन्नास हजार फुटावरून चाललंय म्हणून त्यांचा पण दूर दूर पर्यंत संबंध नाही, अशी टीका ठाकरे यांनी शिंदे यांच्यावर केली.
पोस्टमध्ये काय आहे?
महाराष्ट्र विधानसभेला लाभलेल्या गौरवशाली परंपरेची आठवण करून देत राज ठाकरे म्हणाले, "या सभागृहाला अध्यक्ष म्हणून गणेश वासुदेव माळवणकर लाभले जे पुढे लोकसभेचे पहिले अध्यक्ष झाले. नार्वेकर ज्या अलिबागमधून येतात तिथले दत्तात्रय काशिनाथ कुंटे, अरुणभाई गुजराथी, बाळासाहेब भारदे, अगदी आत्ताचे दिलीप वळसे पाटील अध्यक्ष होते. अशी अध्यक्षांची परंपरा कुठे आणि सध्याची काय ही अवस्था?
विधिमंडळाच्या कामकाजाचे चित्रण बघवत आणि ऐकवतही नाही, इतके ते सुमार दर्जाचे सुरू आहे."
आपल्या भाषेची गळचेपी केंद्राकडून हिंदी लादून, परप्रांतीयांकडून आणि आता राज्याच्या विधिमंडळाकडूनही होत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. "मराठी माणसाने विचार करावा की काय पद्धतीची माणसं आणि सरकार आपण निवडून देत आहोत. महाराष्ट्राच्या विधानसभेत मराठी भाषेची धिंडवडे काढणाऱ्या या बेजबाबदार वृत्तीचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे तीव्र निषेध!" अशा कडक शब्दांत राज ठाकरेंनी आपल्या पोस्टचा शेवट केला आहे.