ओमराजे निंबाळकर २० जूनला आपली भूमिका जाहीर करणार, आज ठाकरेंच्या बैठकीला दांडी मारणार
गुरुवार, १८ जून, २०२६
Edit
पुणे: महाराष्ट्राच्या राजकारणात 'ऑपरेशन टायगर'मुळे उडालेला गदारोळ थांबण्याचे नाव घेत नाहीये. शिवसेना ठाकरे गटाचे ६ खासदार फुटून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत जाणार असल्याच्या चर्चांदरम्यान धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या भूमिकेने सस्पेन्स कमालीचा वाढवला आहे. एकीकडे ओमराजे निंबाळकर
यांनी आपल्या अधिकृत भूमिकेसाठी २० जूनची डेडलाईन दिली आहे, तर दुसरीकडे
त्यांनी आजच्या दिल्लीतील ठाकरे गटाच्या खासदारांच्या संसदीय दलाच्या
बैठकीला उपस्थित राहणार नसल्याचे सांगितले आहे.
"२० जूनच्या निकालानंतरच अधिकृत भूमिका मांडणार" – ओमराजे निंबाळकर
पक्षांतराच्या
चर्चांवर खासदार ओमराजे निंबाळकर यांनी अखेर मौन सोडले असून ते सध्या
दिल्लीत नसून कुटुंबासह पुण्यातच असल्याचे स्पष्ट केले आहे. "मी अद्याप
कोणताही राजकीय निर्णय घेतलेला नाही. सध्या माझ्यासाठी आणि माझ्या
कुटुंबासाठी पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरण सर्वात महत्त्वाचे आहे. या
प्रकरणाचा महत्त्वाचा निकाल २० जून रोजी येणार आहे. हा निकाल आल्यानंतरच मी
माध्यमांशी संवाद साधून माझी पुढील अधिकृत भूमिका मांडेल. तोपर्यंत मी इतर
कोणत्याही गोष्टीवर बोलणार नाही."
बुधवारी पहाटे चार्टर्ड विमान पुण्यात आले आणि निंबाळकरांना दिल्लीला घेऊन गेल्याचे दावे केले जात होते. तर त्यांच्या आईने ओमराजे सकाळी जिमला जातोय असे सांगून बाहेर पडल्याचे सांगितले होते. या बंडखोरीच्या वृत्तांनंतर धाराशिव जिल्ह्यातील ठाकरे गटाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी कमालीचे संतप्त झाले आहेत. उद्धव ठाकरे यांनी ओमराजेंना एकदा आमदार आणि दोनदा खासदार करून राजकीय ताकद दिली, तरीही त्यांनी गद्दारी केल्यास ते सहन केले जाणार नाही, ओमराजे निंबाळकर यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यास ते जिल्ह्यात दिसतील तिथं त्यांच्या तोंडाला शेण फासू, असा थेट इशारा दिला आहे.
ठाकरेंच्या शिवसेनेकडून 'व्हीप' जारी
ठाकरे
गटाने या बंडखोरीला रोखण्यासाठी कंबर कसली आहे. पक्षाने आपल्या सर्व
लोकसभा खासदारांना 'व्हीप' जारी केला असून गुरुवारी सकाळी ११ वाजता नवी
दिल्लीत संसदीय दलाची तातडीची बैठक बोलावली आहे. या बैठकीला ओमराजे
निंबाळकर जाणार नाहीत. परंतू, बंडखोरांपैकी किती खासदार या बैठकीला हजेरी
लावतात, किती जण दांडी मारतात यावर आता पुढील राजकारण ठरणार आहे.