सिलेंडर पुन्हा महागला! घरगुती गॅसच्या दरात २९ रुपयांनी वाढ
घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किंमती पुन्हा वाढल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांच्या बजेटवर परिणाम होणार आहे. मात्र, एलपीजी सिलेंडरचे दर आणखी वाढण्याच्या संकेत आहेत. व्यावसायिक वापराच्या सिलेंडरनंतर घरगुती सिलेंडरच्या किंमती वाढल्यानंतर केंद्र सरकारने दरवाढीचे कारणही सांगितले आहे. त्यामुळे दर आणखी वाढण्याचीच शक्यता दिसत आहे.
तेल वितरक कंपन्यांनी ७ जूनच्या रात्रीपासून घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किंमती २९ रुपयांनी वाढवल्या आहेत. त्यामुळे देशभरात घरात स्वयंपाकासाठी वापरला जाणारा सिलेंडरसाठी जास्त पैसे मोजावे लागणार आहेत.
केंद्र सरकारने वाढत्या दराबद्दल काय सांगितलं?
घरगुती वापराच्या एलपीजी सिलेंडरबद्दल केंद्र सरकारने भूमिका मांडली आहे. 'भारतात घरातील स्वयंपाकासाठी वापरल्या जाणाऱ्या गॅसच्या किंमती जगात सर्वात कमी आहेत. शेजारील देशांच्या तुलनेत फक्त भारतातच सिलेंडरच्या किंमती सर्वात कमी आहेत. अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि कॅनडा यासारख्या विकसित देशांच्या तुलनेत भारतात एलपीजी सिलेंडर खूपच कमी दरात मिळत आहे."
एका सिलेंडर मागे ७०० रुपयांचे नुकसान
"एक सिलेंडरचा पुरवठा करण्यासाठी जवळपास १६०० रुपयांपेक्षा जास्त खर्च होत आहे. याचा परिणाम म्हणून घरगुती वापरायच्या प्रत्येक सिलेंडरमागे ७०० रुपयांचे नुकसान होत आहे. फेब्रुवारी आणि जून २०२६ मध्ये या काळात एलपीजी सौदी कॉन्ट्रॅक्ट प्राइसमध्ये जवळपास ४६ टक्क्यांनी वाढ झाली आहे. कारण होर्मुझ सामुद्रधुनीत अडथळे निर्माण झाले आहेत", असेही सरकारने म्हटले आहे.
"होर्मुझ सामुद्रधुनीतून वाहतूक करणे कठीण झाल्याने आखाती देशांमधून पुरवठा कमी झाला आहे, त्यामुळे १४.२ किलोच्या सिलेंडरचा खर्च खूप वाढला आहे. त्याचाच परिणाम म्हणून सर्वसामान्य ग्राहकांसाठी किंमत ९४२ रुपये प्रति सिलेंडर अशी करण्यात आली आहे", असे केंद्र सरकारने म्हटले आहे.
तेल वितरक कंपन्यांकडून दरवाढ करण्यात आल्यानंतरही सरकारकडून ७०० रुपये तोटा होत असल्याचे सांगितले आहेत. याचा संबंध विश्लेषक आणखी भाववाढीशी लावत आहेत. तेल कंपन्यांचा तोटा कमी करण्यासाठी घरगुती वापराच्या सिलेंडरच्या किंमती आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
तीन महिन्यात दुसऱ्यांदा वाढल्या किंमती
पश्चिम आशियामध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे भारताच्या तेल आणि गॅसच्या पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. दुसरं महत्त्वाचे म्हणजे कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्याने महागाईत आणखी तेल ओतले गेले आहे. घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरच्या किंमती तीन महिन्यात दुसऱ्यांदा वाढल्या आहेत. ७ मार्च रोजी प्रति सिलेंडर ७० रुपयांनी दर वाढवण्यात आले होते, आता २९ रुपयांनी त्यात वाढ करण्यात आली आहे.