मुंढेंची धडक कारवाई! मुंबईतील प्रसिद्ध चाट कॉर्नरला टाळं

मुंढेंची धडक कारवाई! मुंबईतील प्रसिद्ध चाट कॉर्नरला टाळं

 


मुंबई: अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त म्हणून २५ मे रोजी कार्यभार हाती घेताच धाडी आणि छाप्यांचे सत्र सुरु केलेल्या तुकाराम मुंढेंच्या विभागाची नजर थेट मुलुंडमध्ये पडली आहे.

 मुंबई आणि ठाण्याच्या वेशीवर असलेल्या या शहरातील प्रसिद्ध चाट कॉर्नरवर एफडीए म्हणजेच अन्न व औषध प्रशासनाने धाड टाकली आहे. पाणीपुरी, भेळपुरी आणि तत्सम चाट पदार्थ विकणारं मुलुंडमधील प्रसिद्ध दुकान सील करण्यात आलं आहे.

रात्री पावणे दहाच्या सुमारास धडक कारवाई

मुलुंडमध्ये अन्न व औषध प्रशासनाने मंगळवारी मोठी कारवाई केली. मुलुंडमधील 'गुप्ता चणा भंडार' येथे एफडीएच्या अधिकाऱ्यांनी छापेमारी केली. या ठिकाणी अनेक नियमबाह्य गोष्टी दिसून आल्यानंतर या दुकानाचा सील ठोकण्यात आलं आहे. त्यामुळे बुधवारपासून 'गुप्ता चणा भंडार'चा व्यवसाय बंद झाला आहे. मुलुंड पश्चिम येथील डम्पिंग रोड, गौतम नगर परिसरातील 'गुप्ता चणा भंडार' या दुकानात एफडीएने मंगळवारी रात्री पावणे दहाच्या सुमारास धडक कारवाई केली. या ठिकाणी धाड टाकण्याचे आदेश अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांनी दिले होते.

कोणता माल जप्त करण्यात आला?

एफडीएच्या तपासणीदरम्यान दुकानात अत्यंत अस्वच्छ व आरोग्याला घातक परिस्थिती आढळून आली. विक्रीसाठी ठेवलेल्या अन्नपदार्थांच्या पाकिटांवर उत्पादकाचे नाव, उत्पादन दिनांक आणि मुदत संपण्याची तारीख नमूद नसल्याचे निदर्शनास आले. त्यामुळेच एफडीएने जप्तीची कारवाई केली. या ठिकाणाहून एकूण 114.2 किलो अन्नसाठा जप्त करण्यात आला आहे. जप्त करण्यात आलेल्या अन्नसाठ्याची अंदाजे किंमत रु. 8,290 इतकी आहे. जप्त करण्यात आलेल्या पदार्थांमध्ये 68 किलो भाजलेला चणा, 19.5 किलो बारीक शेव, 18 किलो मुरमुरे, 5.2 किलो पाणीपुरीची पुरी आणि 3 किलो शेवपुरीच्या पुरीचा समावेश असल्याची माहिती एफडीएने दिली आहे.

कोणत्या नियमांअंतर्गत पाठवली 'स्टॉप बिझनेस नोटीस'?

'गुप्ता चणा भंडार'मध्ये तयार केल्या जाणाऱ्या पदार्थांमध्ये संशयास्पद रंग वापरण्यात आलेल्या हिरव्या वाटाण्यांचाही साठा जप्त करण्यात आला आहे. जप्त केलेल्या अन्नपदार्थांचे नमुने प्रयोगशाळा तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. प्रयोगशाळेचा अहवाल आल्यानंतर संबंधितांविरुद्ध पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. अस्वच्छता आणि कीटक प्रादुर्भावाची शक्यता लक्षात घेऊन या दुकानाला 'स्टॉप बिझनेस नोटीस' बजावण्यात आली. परिसराची स्वच्छता, निर्जंतुकीकरण आणि त्रुटींची पूर्तता होईपर्यंत व्यवसाय बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 'गुप्ता चणा भंडार' हे मुलुंडमधील प्रसिद्ध चाट विक्री केंद्र असून इथे रोज सायंकाळी ग्राहकांची मोठी गर्दी पाहायला मिळते.