बारामतीत शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली फसवणूक; बिग बुल ट्रेडिंग कंपनीविरोधात गुन्हा दाखल
बारामती: शेअर मार्केटमध्ये भरघोस परताव्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी बारामती शहर पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बिग बुल ट्रेडिंग कंपनीसह त्यांच्या स्थानिक एजंटवर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या प्रकरणात आणखी अनेक गुंतवणूकदार फसले असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असून या कंपनीत गुंतवणूक केली असल्यास तक्रारीसाठी पुढे येण्याचं आवाहन बारामती शहर पोलिसांनी केले आहे.
कार्तिक अरविंद नाळे, गौरव अरविंद नाळे आणि बिग बुल कंपनीवर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३१६(२), ३१८, ३४० सह ३(५) तसेच महाराष्ट्र ठेवीदारांच्या हितसंरक्षण अधिनियम, १९९९ चे कलम ३ नुसार हा गुन्हा दाखल करण्यात असून पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, आरोपींनी स्वतःला शेअर मार्केटमधील अनुभवी ट्रेडर, गुंतवणूक तज्ज्ञ तसेच SEBI मान्यताप्राप्त व्यक्ती असल्याचे भासवून नागरिकांना शेअर मार्केट ट्रेडिंग, फॉरेक्स ट्रेडिंग, पोर्टफोलिओ मॅनेजमेंट आणि विविध गुंतवणूक योजनांमध्ये पैसे गुंतविण्यास प्रवृत्त केले. गुंतवणूकदारांना दरमहा 10 ते 15 टक्के निश्चित परतावा मिळेल, मूळ रक्कम सुरक्षित राहील, तोटा झाल्यास जबाबदारी आमची राहील आणि मुदत पूर्ण झाल्यावर संपूर्ण रक्कम परत केली जाईल, अशी आश्वासने देण्यात आली.
त्यानंतर वारंवार पाठपुरावा करूनही पैसे मिळत नसल्याने अखेर या प्रकरणी बारामती शहर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून अनेक गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणावर रक्कम गुंतविल्याचे समोर आले असून काही व्यवहारांशी संबंधित करारनामे, बँक व्यवहार, धनादेश, इलेक्ट्रॉनिक संदेश आणि इतर महत्त्वाचे पुरावेही पोलिसांच्या हाती लागले आहेत.
या प्रकरणात आणखी अनेक नागरिक आर्थिक फसवणुकीचे बळी ठरले असण्याची शक्यता असल्याने संबंधित सर्वांनी आपले पुरावे, कागदपत्रे आणि तक्रारींसह बारामती शहर पोलीस ठाण्यात प्रत्यक्ष उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. गुंतवणूकदारांनी आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक स्टेटमेंट, UPI व्यवहारांचे तपशील, धनादेश, करारनामे, WhatsApp संदेश, ई-मेल, जाहिराती, ट्रेडिंग कोर्स फी पावत्या तसेच गुंतवणुकीशी संबंधित इतर कोणतेही पुरावे सोबत आणावेत, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
सदर गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड आणि प्रभारी पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रत्नदीप भंडारे करीत आहेत.