घरकुल योजना व सदनिकांबाबतचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी बारामती नागपरिषदेमध्ये पाच सदस्यांची समिती स्थापन

घरकुल योजना व सदनिकांबाबतचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी बारामती नागपरिषदेमध्ये पाच सदस्यांची समिती स्थापन

 

बारामती: सुहासनगर घरकुल योजना तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसाहतीमधील वाटप करण्यात आलेल्या सदनिकांबाबतचा दीर्घकाळ प्रलंबित असलेला प्रश्न मार्गी लावण्यासाठी बारामती नगरपरिषदेने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत या विषयावर सविस्तर चर्चा झाल्यानंतर सर्वसंम्मतीने पाच सदस्यीय समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला.

सभागृहात विषय क्रमांक २३ अंतर्गत या प्रश्नावर चर्चा झाली.यावेळी विविध सदस्यांनी आपापली मते मांडत लाभार्थ्यांना न्याय मिळावा, प्रलंबित प्रश्नांचा वस्तुनिष्ठ आढावा घ्यावा आणि सर्व संबंधित पक्षांशी चर्चा करून कायमस्वरूपी तोडगा काढावा,अशी भूमिका मांडली.

नगराध्यक्ष सचिन सातव यांनी समितीची घोषणा केली. या समितीमध्ये नगरसेवक बिरजू मांढरे, नवनाथ बल्लाळ, आरती शेंडगे, संघमित्रा चौधरी आणि ॲड. प्रसाद खारतोडे यांचा समावेश करण्यात आला आहे. समिती संबंधित प्रकरणाचा सखोल अभ्यास करून वस्तुस्थितीचा अहवाल तयार करणार असून त्याआधारे पुढील निर्णय घेतला जाणार आहे.

चर्चेदरम्यान नगरसेवक बिरजू मांढरे, नवनाथ बल्लाळ, आरती शेंडगे आणि संघमित्रा चौधरी यांनी नागरिकांच्या हिताच्या दृष्टीने पारदर्शक व न्याय्य निर्णय होण्याची गरज व्यक्त केली. लाभार्थ्यांमध्ये कोणताही संभ्रम राहू नये तसेच कोणावरही अन्याय होणार नाही, याची काळजी घेण्याची मागणीही करण्यात आली.

सभागृहातील चर्चेनंतर या संवेदनशील विषयावर अंतिम निर्णय घेण्यापूर्वी समितीचा अहवाल मागविण्यात येणार असून, सर्व संबंधित घटकांशी चर्चा करून सामंजस्यपूर्ण तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्यामुळे सुहासनगर घरकुल योजना आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसाहतीतील सदनिकांबाबतचा प्रश्न आता निर्णायक टप्प्यात पोहोचल्याची भावना व्यक्त होत आहे.