बारामती नगरपरिषद उभारणार अजितदादा पवार यांचे भव्य स्मारक

बारामती नगरपरिषद उभारणार अजितदादा पवार यांचे भव्य स्मारक

 


बारामती : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे स्मारक उभारताना ५० मीटर उंचीचा टॉवर उभारला जाणार असून त्यावरुन बारामतीचा सर्वांगिण विकास अनुभवता येईल, अजितदादांच्या उंचीप्रमाणेच या स्मारकस्तंभाचीही उंची बारामतीतील सर्वाधिक असेल, अशी माहिती नगराध्यक्ष सचिन सातव यांनी दिली. उपनगराध्यक्षा श्वेता नाळे, मुख्याधिकारी पंकज भुसे यांच्यासह बहुसंख्य नगरसेवक या बैठकीस उपस्थित होते.

बारामती नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा मंगळवारी (ता. २३ ) पार पडली. या सभेमध्ये एकमताने उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे स्मारक उभारण्याच्या विषयाला मंजूरी दिली गेली.

प्रशासकीय भवनाशेजारील जागेत तीन मजली म्युझियम उभारुन यात अजितदादांना मिळालेल्या वस्तू ठेवल्या जाणार आहेत. या शिवाय अजित पवार यांचा सर्वात जवळचा विषय म्हणजे जनता दरबार होता. या जनता दरबाराची प्रतिकृतीही येथे उभारली जाईल, अजित पवार यांच्या जन्मापासून अखेरच्या श्वासापर्यंतचा त्यांचा जीवनपट दृकश्राव्य माध्यमातून उलगडला जाणार आहे.

बारामतीत येणा-या प्रत्येकाला प्रेरणा मिळावी आणि अजितदादांचे काम भावी पिढीलाही माहिती व्हावे या साठी अत्यंत भव्य असे हे स्मारक उभारण्याचा निर्णय बारामती नगरपरिषेने घेतला आहे.

दरम्यान स्वच्छता हा दादांचा आवडता विषय असल्याने अजितदादांचा स्वच्छता कर्मचा-यांसोबतचा पुतळा व्हावा, त्यांच्या नावाने शिष्यवृत्ती सुरु करावी तसेच त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याची शिफारस नगरपरिषदेने राज्य शासनाकडे करावी अशा सूचना विविध नगरसेवकांनी केल्या. अजित पवार यांचे स्मारक हा सर्वच बारामतीकरांसाठी भावनिक विषय असून त्याला तातडीने मूर्त स्वरुप देण्यासाठी सर्व जण प्रयत्न करतील, अशी ग्वाही सचिन सातव यांनी सभागृहास दिली.