बारामतीच्या मेडिकल कॉलेजच्या डिनसह दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची बदली; डॉ. अंजली पाटील यांच्याकडे कार्यभार
बारामती: बारामती येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय महाविद्यालय व रुग्णालयाला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी अचानक भेट देत येथील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना फैलावर घेतले होते. रुग्णालयात रुग्णांची होणारी गैरसोय, कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचा निष्काळजीपणा या बाबींची गंभीर दखल सुनेत्रा पवार यांनी घेतली होती. त्यानंतर आता या रुग्णालयाच्या डिनसह दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. दरम्यान, या माध्यमातून सुनेत्रावहिनींनी कामचुकारांना ‘दादा स्टाईल’ इशारा दिल्याची चर्चा आता होत आहे.
बारामती येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय महाविद्यालय व रुग्णालयाला सुनेत्रा पवार यांनी अचानक भेट देत येथील व्यवस्थांची पाहणी केली होती. रुग्णांना सतत येणाऱ्या अडचणी, रुग्णालयात अनेक सुविधा असूनही होणारी गैरसोय, रुग्णालयातील अस्वच्छता अशा अनेक विषयांवर त्यांनी उपस्थित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची कानउघडणी केली होती. दिवसभर तुम्ही काय करता असा सवाल करत त्यांनी रुग्णालयाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना धारेवर धरलं होतं.
सुनेत्रावहिनींनी रुग्णालयाला भेट दिल्यानंतर अवघ्या काहीच दिवसात वैद्यकीय शिक्षण विभागाने या रुग्णालयाच्या डिनसह दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची बदली केली आहे. या रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत म्हस्के यांची रत्नागिरी येथे बदली करण्यात आली आहे. तर शल्यचिकित्साशास्त्र विभागाच्या प्राध्यापिका डॉ. मंजूषा लटके यांची पुण्यातील ट्रॉमा केअर सेंटर येथे बदली करण्यात आली आहे. तसेच रुग्णालयाचे प्रशासकीय अधिकारी नंदकूमार कोकरे यांची अहिल्यानगर येथे बदली करण्यात आली आहे.
मेडिकल कॉलेजचा कार्यभार डॉ. पाटील यांच्याकडे
दरम्यान, डॉ. चंद्रकांत म्हस्के यांच्या बदलीने रिक्त झालेल्या जागी याच रुग्णालयातील शरीरशास्त्र विभागाच्या प्राध्यापिका डॉ. अंजली पाटील यांच्याकडे कार्यभार सोपवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. डॉ. पाटील यांना त्यांच्या पदाची कर्तव्ये व जबाबदाऱ्या सांभाळून या रुग्णालयाच्या अधिष्ठाता पदाचा अतिरिक्त कार्यभार स्वीकारण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. त्यामुळे यापुढे डॉ. पाटील या बारामतीच्या रुग्णालयाचा कार्यभार सांभाळणार आहेत. तसेच पुण्याच्या बीजे वैद्यकीय महाविद्यालयातील सहयोगी प्राध्यापक डॉ. किरणकुमार जाधव यांचीही बारामतीत बदली करण्यात आली आहे.
सुनेत्रावहिनींची भेट अन बदल्यांचा आदेश
सुनेत्रा पवार यांनी बारामतीतील वैद्यकीय महाविद्यालयाला कोणतीही पूर्वसूचना न देता अचानक भेट दिली होती. त्यामुळं येथील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची चांगलीच भंबेरी उडाली होती. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचा कामचुकारपणा आणि रुग्णांची गैरसोय यावरून सुनेत्रा पवार यांनी खडे बोल सुनावले होते. त्यानंतर अवघ्या काहीच दिवसात डिनसह दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची बदली झाली आहे. त्यामुळे कामचुकार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सुनेत्रावहिनींकडून एक प्रकारे इशाराच देण्यात आल्याची चर्चा होत असून या कारवाईमुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.