पुण्यात पहिल्या रांगेत बसण्यावरून भाजप खासदार-आमदारांचा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत वाद! मेधा कुलकर्णींचा कार्यक्रमावर बहिष्कार
पुणे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात भारतीय जनता पक्षाच्या राज्यसभा खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी आणि आमदार अभिमन्यू पवार यांच्यात पहिल्या रांगेत कोण बसणार यावरून शुक्रवारी वाद झाला. खासदार आणि आमदारांमध्ये त्यावरून शाब्दिक युद्ध रंगले. त्यानंतर खासदार मेधा कुलकर्णींनी या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला. सारथी या संस्थेच्या वतीने युपीएससी आणि एमपीएससीमधील यशस्वी विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांच्या सत्कार समारंभाचे आयोजन शुक्रवारी गणेश कला क्रिडा रंग मंच येथे करण्यात आले होते. या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह सारथी संस्थेचे अधिकारी, लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
या कार्यक्रमासाठी खासदार मेधा कुलकर्णी आणि आमदार अभिमन्यू पवार हेही व्यासपीठावर उपस्थित होते. मात्र या दोघांमध्ये पहिल्या रांगेत बसण्यावरून जोरदार वाद झाला. अभिमन्यू पवार यांनी जातीय भाषेत टीका केल्याचा आरोप मेधा कुलकर्णी यांनी करत कार्यक्रमातून काढता पाय घेतला. त्यावर मी जातीचा विषय किंवा वाद काढलाच नाही, असा खुलासा अभिमन्यू पवार यांनी केला.
दरम्यान प्रसार माध्यमांशी बोलताना अभिमन्यू पवार यांनी दिलगीरी व्यक्त केली. मेधा कुलकर्णी यांचा गैरसमज झाला आहे. नरेंद्र पाटील पुढे बसतील असे मी त्यांना म्हणालो. कारण ते आण्णासाहेब विकास महामंडाळाचे अध्यक्ष आहेत. आपण दोघे मागे बसू, असे मी त्यांना सांगितलं. यात कोणत्याही जातीचा विषय किंवा वाद नव्हता, असे अभिमन्यू पवारांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. मेधाताईंचा गैरसमज झाला आहे. मी त्याबद्दल दिलगीरी व्यक्त करतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.
मी कार्यक्रम स्थळी पोहोचल्यानंतर राजशिष्टाचारानुसार माझी जागा निश्चित झाली होती. मात्र हा मराठा समाजाचा कार्येक्रम आहे. तुम्ही मागे बसा. नरेंद्र पाटील पुढे बसतील. असे मला पवार यांनी सांगितले. मात्र त्यावरून वाद झाला. अभिमन्यू पवार यांच्यासाठीच मी त्यांच्या निवडणुकीत ब्राह्मण समाजाचा त्यांच्या मतदार संघात मेळावा घेतला होता. इथं जातीचा विषय येत नाही. त्यानंतर मी कार्यक्रमातूनल बाहेर पडले. – खासदार प्रा. डॉक्टर मेधा कुलकर्णीं