केतन अग्रवाल हत्याकांडाचा खटला उज्वल निकम लढवणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा

केतन अग्रवाल हत्याकांडाचा खटला उज्वल निकम लढवणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा

 

पुणे: पुणे जिल्ह्यातील केतन अग्रवाल हत्या प्रकरण आता न्यायालयापर्यंत पोहोचले आहे. ज्येष्ठ सरकारी वकील उज्वल निकम हे अग्रवाल कुटुंबाच्या वतीने हा खटला लढणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (शुक्रवार, २६ जून) केतनच्या कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोषींना कठोरात कठोर शिक्षा मिळेल, असे आश्वासन त्यांना दिले.

मुख्यमंत्री कार्यालयाने (CMO) सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर (X) यासंदर्भात माहिती देताना सांगितले की, "लोणावळा ग्रामीण परिसरात झालेल्या केतन अग्रवाल यांच्या दुर्दैवी हत्येच्या प्रकरणात केतन अग्रवाल यांचे वडिल विशाल अग्रवाल यांनी आज पुण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि आपल्या मुलाला न्याय मिळावा, अशी मागणी केली." यावर, "या प्रकरणातील दोषींना कठोर शिक्षा व्हावी, यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. कुटुंबीयांना न्याय देण्यासाठी कोणतीही कसूर ठेवली जाणार नाही," असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी त्यांना दिले.

याच बरोबर, "या प्रकरणात जलदगती न्यायालय आणि विशेष सरकारी वकिल म्हणून उज्वल निकम यांची नियुक्ती करण्याची त्यांची (अग्रवाल कुटुंब) मागणीसुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्काळ मान्य केली आणि तसे निर्देश विधी व न्याय विभागाच्या सचिवांना दिले. ज्येष्ठ विधिज्ञ उज्वल निकम यांनीही या प्रकरणात विशेष सरकारी वकील म्हणून काम पाहण्यास संमती प्रदान केली आहे." असेही या पोस्टमध्ये सांगण्यात आले आहे.