'तुकाराम मुंढेंच्या बदलीच्या भानगडीत पडाल तर सरकारच्या मागे लागणार!', मनोज जरांगे पाटील यांचा इशारा

'तुकाराम मुंढेंच्या बदलीच्या भानगडीत पडाल तर सरकारच्या मागे लागणार!', मनोज जरांगे पाटील यांचा इशारा

 

धाराशिव: आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे हे खूप चांगलं काम करत आहेत. त्यांनी सुरू केलेल्या भेसळविरोधी मोहिमेमुळे सामान्यांचे जीवन सुधारेल आणि शेतकऱ्यांच्या दुधाला चांगला भाव मिळेल. त्यामुळे सरकारने तुकाराम मुंढे यांच्या बदलीच्या भानगडीत पडू नये, अन्यथा आम्ही सरकारच्या मागे लागू," असा कडक इशारा मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला दिला आहे.

कळंब मार्गे काेल्हापूरला जात असताना त्यांनी रविवारी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, तुकाराम मुंढे यांच्या धडक कारवाईमुळे त्यांच्या बदलीसाठी राजकीय हालचाली सुरू असल्याच्या चर्चा कानावर येत आहे. "मुंढे साहेब प्रामाणिकपणे काम करत आहेत. भेसळ रोखल्यामुळे शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे. अशा कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याची जर राजकीय दबावापोटी बदली करण्याचा प्रयत्न झाला, तर सरकारला त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील," असे जरांगे यांनी स्पष्ट केले.

शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती द्या
रोहित पवार शेतकऱ्यांसाठी लढत आहेत, म्हणून कोल्हापूरला जाता-जाता मी त्यांची भेट घेणार आहे. या भेटीचा कोणताही राजकीय संदर्भ नसून आमचा इतर पक्षांशी काही देणेघेणे नाही. नसल्याचे सांगत सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही तर संपूर्ण कर्जमुक्ती द्यावी, अशी मागणीही मराठा आरक्षणाचे नेते जरांगे पाटील यांनी केली.

कोल्हापूर-सातारा गॅझेटबाबत सरकारवर विश्वास
कुणबी नोंदींच्या संदर्भातील कोल्हापूर आणि सातारा गॅझेट लागू करण्याबाबत जरांगे-पाटील यांनी सरकारवर विश्वास व्यक्त केला. "या गॅझेटसाठी सरकार पुन्हा आंदोलनाची वेळ येऊ देणार नाही. आता फक्त औपचारिकता बाकी असून सरकार हे गॅझेट लागू करेल," असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. याच मुद्द्यावर ते आज कोल्हापूरचे खासदार छत्रपती शाहू महाराज यांची भेट घेणार असल्याचेही त्यांनी माध्यमांना सांगितले.