भाटघर धरणातील पाणी ओसरताच पांडवकालीन नागोबा मंदिराचे दर्शन; इतिहासाच्या खुणा पुन्हा उजेडात

भाटघर धरणातील पाणी ओसरताच पांडवकालीन नागोबा मंदिराचे दर्शन; इतिहासाच्या खुणा पुन्हा उजेडात

 


भोर : भाटघर धरणातील पाणीसाठा कमी झाल्याने जुन्या वेळवंड (ता. भोर) गावठाणातील पांडवकालीन नागोबा मंदिर पुन्हा एकदा दर्शनास आले आहे. दहा महिने पाण्याखाली राहणाऱ्या या पुरातन मंदिराचे दर्शन घेण्यासाठी परिसरातील भाविक आणि इतिहासप्रेमी मोठ्या उत्सुकतेने भेट देत आहेत.

भोरपासून सुमारे १८ किलोमीटर अंतरावर वेळवंडी नदीवर ब्रिटिशकालीन भाटघर धरणाची उभारणी करण्यात आली होती. धरण बांधताना सुमारे ४० गावांमधील ५ हजार ६७१ एकर जमीन संपादित करण्यात आली होती. त्यावेळी पाणलोट क्षेत्रातील अनेक गावे स्थलांतरित करण्यात आली. मात्र, या गावांच्या आठवणी आजही जुन्या वेशी, घरांच्या खुणा, वाडे आणि मंदिरांच्या रूपाने जिवंत आहेत.

भाटघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील जुन्या वेळवंड गावठाणातील पांडवकालीन नागोबा मंदिर वर्षातील बहुतांश काळ पाण्याखाली असते. धरणातील पाणी ओसरल्यानंतर हे मंदिर पुन्हा उघडकीस आले आहे. मंदिरासमोर पार्वती मातेची मूर्ती आणि नंदी असून मंदिराचा गाभारा व भिंतींचे बांधकाम दगडामध्ये करण्यात आलेले आहे. या मंदिराची प्राचीन वास्तुरचना भाविकांचे विशेष लक्ष वेधून घेत आहे.

सांस्कृतिक वारसा जतन करण्याची गरज

वेळवंड गावातील ग्रामस्थ आणि युवक मंदिराच्या गाभाऱ्यात साचलेला गाळ काढून स्वच्छता करण्याचे काम हाती घेतात. या पौराणिक मंदिराचे दर्शन घेण्यासाठी परिसरातील भाविक मोठ्या संख्येने येथे येत आहेत. प्राचीन इतिहासाची साक्ष देणारा हा सांस्कृतिक वारसा जतन करून पुढील पिढ्यांसाठी संवर्धित करण्याची गरज असल्याची भावना वेळवंड परिसरातील ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.