व्यावसायिक एलपीजी सिलेंडर स्वस्त; घरगुती सिलेंडरचे दर कायम

व्यावसायिक एलपीजी सिलेंडर स्वस्त; घरगुती सिलेंडरचे दर कायम

 

नवी दिल्ली: जुलै महिन्याची सुरुवात व्यावसायिक क्षेत्रासाठी मोठी दिलासादायक ठरली आहे. ऑईल मार्केटिंग कंपन्यांनी १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या दरात १८३.५० रुपयांची मोठी कपात केली आहे. हे नवीन दर १ जुलै म्हणजेच पासून लागू झाले आहेत. चालू वर्षात व्यावसायिक सिलेंडरच्या दरात झालेली ही पहिलीच कपात आहे. त्यामुळे व्यावसायिक ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र, घरगुती ग्राहकांसाठी वापरल्या जाणाऱ्या १४.२ किलोच्या एलपीजी सिलेंडरच्या किमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही, त्याचे दर पूर्वीसारखेच स्थिर आहेत.

व्यावसायिक सिलेंडरच्या दरांमध्ये कपात 

या कपातीमुळे हॉटेल, रेस्टॉरंट, ढाबे आणि इतर व्यावसायिक प्रतिष्ठानांना मोठा दिलासा मिळणार आहे. दिल्लीत पूर्वी ३,११३.५० रुपये असलेला सिलेंडर आता २,९३० रुपये झाला आहे. कोलकातामध्ये पूर्वी ३,२५५.५० रुपये असलेला सिलेंडर आता ३,०८१.५० रुपये झाला आहे. लखनऊमध्ये पूर्वी ३,२३६ रुपये किंमत असलेला सिलेंडर आता ३,०५२.५० रुपये झाला आहे. पटनामध्ये नवीन दरानुसार येथील सिलेंडरची किंमत आता ३,२२७ रुपये झाली आहे. तर मुंबईत पूर्वी २,८८५ मिळणारा सिलेंडर २,७०३ रुपयांना मिळणार आहे.

आजपासून ५ किलो एफटीएलच्या किमतीतही १३ रुपयांची कपात करण्यात आली आहे. दिल्लीत ५ किलो एफटीएलची किंमत ८०८.५० रुपये असेल.

मध्य पूर्वेतील तणाव आणि इराण युद्धाच्या परिस्थितीमुळे गेल्या काही महिन्यांत कच्च्या तेलाच्या किमती प्रचंड वाढल्या होत्या. त्यामुळे व्यावसायिक सिलेंडरच्या दरात सातत्याने वाढ होत होती. मात्र आता परिस्थिती पूर्वपदावर येत असल्याने कच्च्या तेलाचे दर खाली आले आहेत. त्यामुळे कंपन्यांनी हा दरकपातीचा निर्णय घेतला.

घरगुती एलपीजी सिलेंडरचे दर स्थिर

व्यावसायिक सिलेंडर स्वस्त झाला असला, तरी सामान्य नागरिकांच्या घरगुती स्वयंपाकाच्या सिलेंडरच्या (१४.२ किलो) किमतीत कोणताही बदल झालेला नाही. दिल्लीत ९४२ रुपये, कोलकातामध्ये ९६८ रुपये, मुंबईमध्ये ९४१.५० रुपये तर चेन्नईमध्ये ९५७.५० रुपये दराने सिलेंडर मिळत आहेत.

पेट्रोलच्या नियमांत बदल; निर्यात शुल्क ४ रुपये प्रति लीटर

सिलेंडरच्या दरांसोबतच केंद्र सरकारने पेट्रोलच्या निर्यातीबाबतही एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सरकारने पेट्रोलच्या निर्यातीवर लागणारे विशेष अतिरिक्त उत्पादन शुल्क प्रति लीटर १.५ रुपयांवरून वाढवून थेट ४ रुपये प्रति लीटर केले आहे.