बारामतीत उद्या सुधा मूर्ती, सुनेत्रा पवार आणि स्वाती मालीवाल यांच्या उपस्थितीत शिक्षण, महिला सक्षमीकरण आणि आरोग्य क्षेत्रातील उपक्रमांचा शुभारंभ

बारामतीत उद्या सुधा मूर्ती, सुनेत्रा पवार आणि स्वाती मालीवाल यांच्या उपस्थितीत शिक्षण, महिला सक्षमीकरण आणि आरोग्य क्षेत्रातील उपक्रमांचा शुभारंभ

 

बारामती: बारामती येथील विद्यानगरीत शिक्षण, महिला सक्षमीकरण, आरोग्य आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील विविध महत्त्वाकांक्षी उपक्रमांचा शुभारंभ करण्यात येणार आहे. रविवार दि. ५ जुलै रोजी होणाऱ्या या कार्यक्रमाला महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, राज्यसभेच्या खासदार व ज्येष्ठ समाजसेविका सुधा मूर्ती, खासदार स्वाती मालीवाल यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. याच कार्यक्रमात ‘टू व्हील्स ऑफ होप – सायकल बँक” या महत्वाकांक्षी उपक्रमाची सुरुवात केली जाणार असून महाराष्ट्रातील एक लाखांहून अधिक विद्यार्थ्यांपर्यंत सायकली पोहोचविण्याच्या मोहिमेची सुरुवात प्रातिनिधीक स्वरूपात दोन हजार विद्यार्थ्यांना सायकलींचे वितरण करून करण्यात येणार आहे.

ग्रामीण भागातील शैक्षणिक सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी पुणे जिल्हा परिषदेच्या २४० हून अधिक शाळांमध्ये डिजिटल वर्गखोल्या, ५० पेक्षा अधिक शाळांमध्ये STEM प्रयोगशाळा आणि २० शाळांमध्ये Pi Lab सुरू करण्यात येणार आहेत. तसेच दोन शाळांना WASH (पाणी, स्वच्छता व शौचालय) सुविधा हस्तांतरित करण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील शैक्षणिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी IUCAA यांच्या सहकार्याने NASA, ISRO आणि ESA यांच्या शैक्षणिक भेटींसाठी सामंजस्य करार करण्यात येणार आहे. तसेच ज्ञानप्रबोधिनी, देश अप्नाये सहयोग फाउंडेशन, SELCO आणि TISS यांच्यासह विविध शैक्षणिक व सामाजिक उपक्रमांसाठीही सामंजस्य करार केले जाणार आहेत.

कार्यक्रमादरम्यान जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या हस्तलिखित पुस्तकांचे अनावरण करण्यात येणार असून, भारत केंद्रामार्फत विद्यार्थ्यांसाठी पायलट शिष्यवृत्ती उपक्रमाची घोषणा करण्यात येणार आहे. महिलांच्या आरोग्य व सक्षमीकरणासाठी ‘आदिशक्ती’ अंतर्गत गर्भाशयमुख कर्करोगमुक्त पुणे जनजागृती मोहिमेची सुरुवात केली जाणार आहे. यासोबतच महिला रुग्णालयासाठी Biomedical Waste Incinerator यंत्राचे हस्तांतरण, MAATR अॅपच्या विस्तारित आवृत्तीचे उद्घाटन आणि ‘आशा गाथा’ या महिला सक्षमीकरण गीताचे लोकार्पण होणार आहे.

यावेळी आदिशक्ती समन्वयकांना टॅबलेट्स, स्वयंसेविकांना ई-बाईक्स तसेच आशा व अंगणवाडी सेविकांना विविध साहित्याचे वितरण करण्यात येणार आहे. मासिक पाळी स्वच्छता आणि मानसिक आरोग्य विषयावरील प्रशिक्षण पूर्ण केलेल्या सेविकांना प्रमाणपत्रेही देण्यात येणार आहेत. याशिवाय बाल संगोपन योजना, एकल महिला घरकुल योजना, अनाथ प्रमाणपत्रांचे वितरण तसेच एकल महिला बचत गटांना कर्ज मंजुरीपत्रांचे वाटप करण्यात येणार आहे. विद्यार्थी आणि युवकांमध्ये रस्ता सुरक्षा विषयक जनजागृती करण्यासाठी RTO बारामती यांच्या सहकार्याने ‘ड्रायव्हिंग सेफ’ रस्ता सुरक्षा अनुभव केंद्राचे उद्घाटनही याच कार्यक्रमात करण्यात येणार आहे.

पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी सांगितले की, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाच्या शैक्षणिक संधी, आधुनिक डिजिटल सुविधा आणि विज्ञानाधारित शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा परिषद सातत्याने प्रयत्नशील असून, विविध उपक्रमांमुळे ग्रामीण समाजात सकारात्मक बदल घडतील.

पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांनी ग्रामीण भागातील प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि प्रत्येक महिलेपर्यंत आरोग्य व सक्षमीकरणाच्या सुविधा पोहोचविणे हे जिल्हा परिषदेचे प्रमुख ध्येय असल्याचे सांगितले. लोकसहभाग आणि विविध संस्थांच्या सहकार्याने पुणे जिल्ह्याच्या विकासाला नवी दिशा मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.