बारामतीच्या स्वच्छतेला आधुनिकतेची जोड; १ कोटींची अत्याधुनिक सीवर सक्शन-जेटिंग मशीन बारामतीत दाखल..!

बारामतीच्या स्वच्छतेला आधुनिकतेची जोड; १ कोटींची अत्याधुनिक सीवर सक्शन-जेटिंग मशीन बारामतीत दाखल..!

 

बारामती: बारामती शहराची स्वच्छता व्यवस्था अधिक सक्षम, सुरक्षित आणि आधुनिक करण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या विशेष पाठपुराव्यामुळे बारामती नगरपरिषदेला अत्याधुनिक कंबाईंड सीवर सक्शन, जेटिंग आणि डीवॉटरिंग मशीन उपलब्ध झाले आहे. हे अत्याधुनिक वाहन बारामती नगरपरिषदेच्या प्रांगणात दाखल होत असून, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या आगामी बारामती दौऱ्यात त्याचे लोकार्पण करून ते बारामतीकरांच्या सेवेत समर्पित करण्यात येणार आहे.

विशेष म्हणजे, आदरणीय स्वर्गीय अजितदादा पवार यांनी बारामतीमध्ये स्वच्छ, सुंदर आणि हरित शहराची संकल्पना प्रत्यक्षात उतरविण्यासाठी नेहमीच प्राधान्य दिले. स्वच्छता ही केवळ नगरपालिकेची जबाबदारी नसून ती शहराच्या संस्कृतीचा आणि विकासाचा अविभाज्य भाग आहे. असा त्यांचा ठाम विश्वास होता. शहरातील स्वच्छता व्यवस्थेसाठी त्यांनी सातत्याने आधुनिक सुविधा, यंत्रसामग्री आणि सक्षम व्यवस्थापनावर भर दिला. त्याच विचारांचा वारसा पुढे नेत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी बारामतीला ही अत्याधुनिक मशीन उपलब्ध करून दिली असून, दादांच्या स्वच्छ, सुरक्षित आणि आधुनिक बारामतीच्या संकल्पनेला त्यांनी पुढे नेण्याचे काम केले आहे.

सुमारे १८ टन चेसिसवर उभारण्यात आलेल्या या वाहनाची किंमत १ कोटी असून या आधुनिक वाहनामध्ये ८,००० लिटर क्षमतेची टाकी असून त्यापैकी ४,००० लिटर गाळासाठी आणि ४,००० लिटर पाण्यासाठी राखीव आहे. यामध्ये ३,००० m³/hr क्षमतेचा व्हॅक्यूम पंप, १७० बार दाबाने ३२० LPM प्रवाह देणारा हाय-प्रेशर जेटिंग पंप तसेच ४,००० एल पी एम क्षमतेचा डीवॉटरिंग पंप बसविण्यात आला आहे. त्यामुळे सीवर लाईनमधील गाळ काढणे, चेंबर साफ करणे, तुंबलेली गटारे मोकळी करणे तसेच पावसाळ्यात साचलेल्या पाण्याचा जलद उपसा करणे ही सर्व कामे अत्यंत कार्यक्षमतेने करता येणार आहेत.

ही मशीन राज्य शासनाच्या “मॅनहोलकडून मशीनहोलकडे” या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत उपलब्ध झाली आहे. या माध्यमातून मॅनहोल, भूमिगत गटारे, मलजल वाहिन्या, सेप्टिक टाक्या, सिव्हेज टाक्या तसेच सार्वजनिक स्वच्छतागृहांची साफसफाई पूर्णपणे यांत्रिक पद्धतीने केली जाणार असून, स्वच्छता कर्मचाऱ्यांना जीव धोक्यात घालून गटारात उतरावे लागणार नाही. त्यामुळे त्यांच्या सुरक्षिततेला मोठे बळ मिळणार आहे.