स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने बारामतीत विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन..!

स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने बारामतीत विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन..!

 

१९ जुलै रोजी महा रक्तदान शिबिर, २२ जुलै रोजी मोफत वृक्षरोप वाटप; जुलै महिना 'जनसेवा महिना' म्हणून साजरा करणार.

बारामती: स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या  जयंतीनिमित्त बारामती शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने संपूर्ण जुलै महिना 'जनसेवा महिना' म्हणून विविध समाजोपयोगी उपक्रमांनी साजरा करण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत रविवार, दि. १९ जुलै रोजी महा रक्तदान शिबिर तसेच बुधवार, दि. २२ जुलै रोजी नागरिकांना ११ हजार मोफत वृक्षरोपांचे वाटप करण्यात येणार असून, बारामतीकरांनी या उपक्रमांमध्ये मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन बारामती शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष ॲड. किरण इंगळे यांनी केले आहे.

बारामती शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने १ जुलै ते ३१ जुलै २०२६ या कालावधीत सामाजिक बांधिलकी जपत विविध जनहिताचे उपक्रम राबविण्यात येत आहेत. यामध्ये विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप, वृक्षारोपण, महा रक्तदान शिबिर, नेत्र तपासणी शिबिर,शालेय विद्यार्थ्यांचे आरोग्य तपासणी,मोतीबिंदू शस्त्रक्रिया, अन्नदान,योग शिबिर, पावसाळी रेनकोट वाटप आदी उपक्रमांचा समावेश आहे. समाजातील उपेक्षित घटकांना प्रत्यक्ष मदत मिळावी आणि सामाजिक सेवेला चालना मिळावी, हा या उपक्रमामागील उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले.

रविवार, दि. १९ जुलै रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ६.०० या वेळेत शारदा प्रांगण येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयात महा रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. "करू रक्तदान, वाचवू रुग्णाचे प्राण" या संदेशातून अधिकाधिक नागरिकांनी रक्तदान करून गरजू रुग्णांना जीवनदान द्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे. त्यानंतर बुधवार, दि. २२ जुलै रोजी सकाळी ९.३० वाजता शारदा प्रांगण येथे नागरिकांना विविध देशी वृक्ष तसेच फळझाडांची ११ हजार मोफत रोपे वितरित करण्यात येणार आहेत. "हरित बारामती, सुंदर बारामती, स्वच्छ बारामती" या संकल्पनेला बळकटी देण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत असून, पर्यावरण संवर्धनासाठी प्रत्येक नागरिकाने किमान एक तरी वृक्ष लावून त्याचे संगोपन करावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेले हे दोन्ही सामाजिक उपक्रम समाजहिताला प्राधान्य देणारे असून, रक्तदान आणि वृक्षारोपणासारख्या जनकल्याणकारी कार्यात बारामतीकरांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून कार्यक्रम यशस्वी करावा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे.

"स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेले महा रक्तदान शिबिर आणि मोफत वृक्षरोप वाटप हे समाजहिताचे उपक्रम आहेत. महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या प्रेरणेतून, खासदार पार्थ पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच युवा नेते जय पवार यांच्या संकल्पनेतून समाजोपयोगी उपक्रम सातत्याने राबविले जात आहेत. बारामतीकरांनी या उपक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने रक्तदान करावे आणि पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षरोपांचा लाभ घ्यावा असे आवाहन करतो 

                ॲड. किरण इंगळे

 ( शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बारामती)