चालकांना ८० टक्के भाडे, मराठी भाषा अनिवार्य; महाराष्ट्रात नवे ॲग्रिगेटर धोरण लागू, काय आहे नियम?
परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी गुरुवारी धोरणाची माहिती देताना सांगितले की, लाखो नागरिक रोज ॲप-आधारित टॅक्सी सेवांचा वापर करतात. मात्र, या क्षेत्रासाठी एकसमान नियमावली नसल्याने प्रवासी सुरक्षा, भाडे आकारणीतील मनमानी, चालकांचे उत्पन्न, तक्रार निवारणाबाबत अनेक प्रश्न निर्माण होत होते. प्रत्येक ॲग्रिगेटर कंपनीला राज्य परिवहन प्राधिकरणाकडून परवाना घ्यावा लागेल. यासाठी ऑनलाइन पोर्टल विकसित करणार असून, त्याद्वारे जीपीएस ट्रॅकिंग, चालकांची पडताळणी आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर रिअल-टाइम कारवाई केली जाणार आहे.
भाडे आकारणीतील मनमानी रोखण्यासाठी...
मूलभूत भाडे निश्चित करणार : भाडे आकारणीतील मनमानी रोखण्यासाठी प्रादेशिक परिवहन प्राधिकरण मूलभूत भाडे निश्चित करणार आहे. सर्ज प्रायसिंगवर मर्यादा घालण्यात आला असून, सुविधा शुल्कालाही कमाल मर्यादा निश्चित करण्यात आली आहे.
चालकांसाठी बॅज अनिवार्य : राज्यात व्यावसायिक प्रवासी वाहतूक करणाऱ्या चालकांसाठी बॅज अनिवार्य करण्यात आला आहे. हा बॅज मिळविण्यासाठी महाराष्ट्रातील रहिवासी असल्याचा पुरावा आणि व्यावहारिक मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक राहाणार आहेत.
महिलांसाठी सुरक्षित राइड पुलिंग : महिलांच्या सुरक्षिततेसाठी राइड पुलिंगमध्ये महिला प्रवाशांना केवळ महिला चालक किंवा महिला सहप्रवाशांसोबत प्रवास करण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
नफाखोरीमुक्त कार पुलिंग : खासगी वाहनांद्वारे कारपुलिंगला प्रथमच कायदेशीर चौकट देण्यात आली आहे. मात्र, कारपुलिंगमधून नफा कमावण्यास परवानगी नसून केवळ प्रवासाचा खर्च सहभागी प्रवाशांमध्ये वाटून घेता येणार आहे.