महाराष्ट्रात मुख्यमंत्रिपदाची रिक्त जागा नाही : एकनाथ शिंदे यांनी दिला चर्चांना पूर्णविराम

महाराष्ट्रात मुख्यमंत्रिपदाची रिक्त जागा नाही : एकनाथ शिंदे यांनी दिला चर्चांना पूर्णविराम

 

नवी दिल्ली: राज्यात मुख्यमंत्रिपदाची कोणतीही रिक्त जागा नसून देवेंद्र फडणवीस हे पुढील निवडणुकीपर्यंत मुख्यमंत्री राहतील असे स्पष्ट करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाच्या चर्चांना पूर्णविराम दिला.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर बुधवारी त्यांनी  डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या निवासस्थानी माध्यमांशी संवाद साधला. केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चांना वेग आलेला असतानाच शिंदे यांनी उद्धवसेनेतून शिंदेसेनेत दाखल झालेल्या सहा खासदारांसह शाह यांची भेट घेतली. या भेटीत राज्यातील आणि संबंधित मतदारसंघांतील विकासकामांबाबत गृहमंत्र्यांशी सविस्तर चर्चा झाल्याची माहिती शिंदे यांनी दिली. उद्धवसेनेतील सहा खासदारांचा शिंदेसेनेत झालेला प्रवेश पूर्णपणे कायदेशीर आणि सर्व प्रक्रिया पूर्ण करूनच करण्यात आला आहे, असा दावाही त्यांनी यावेळी केला. 

एनडीएमध्ये प्रवेशाचा निर्णय कोणाचा?
शरद पवार राष्ट्रीय लोकशाही आघाडीत सहभागी होणार असल्याच्या चर्चेबाबत शिंदे म्हणाले, आम्ही राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे विश्वासू घटक आहोत. मात्र, कोणता पक्ष आघाडीत सहभागी होणार, याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हेच घेतील. 

आपल्या पक्षाचा नेता मुख्यमंत्री व्हावा, अशी इच्छा कार्यकर्त्यांची असते. त्यात काही गैर नाही. मात्र, आमची भूमिका मुख्यमंत्रिपद मिळविण्याची नाही. खुर्ची हा आमचा अजेंडा नाही.

 - एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री