बारामतीत दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राज्यातील पहिल्या पूर्णाकृती पुतळ्याचे भावपूर्ण लोकार्पण

बारामतीत दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राज्यातील पहिल्या पूर्णाकृती पुतळ्याचे भावपूर्ण लोकार्पण

 

बारामती: दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राज्यातील पहिल्या पूर्णाकृती पुतळ्याचे व अजित पवार यांच्या छायाचित्र दालनाचे गुरुवारी २३ बारामतीत लोकार्पण करण्यात आले. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, विजया पाटील, राजेंद्र पवार, जय पवार हे पवार कुटुंबिय या प्रसंगी उपस्थित होते.

येथील नटराज नाटय कला मंडळाचे अध्यक्ष किरण गुजर यांच्या पुढाकारातून तिरंगा सर्कल येथे नटराज नाटय कला मंडळाच्या कार्यालयाच्या आवारात अजित पवार यांचा ब्रॉंझचा पूर्णाकृती पुतळा साकारण्यात आला आहे.

गुरुवारी त्याचे अत्यंत भावपूर्ण वातावरणात हे लोकार्पण केले गेले. या प्रसंगी सर्वधर्मिय प्रार्थना सादर केली गेली. पोलिस पथकाने मानवंदना दिली. पोलिस बँडने गीते सादर केली. बारामती पंचक्रोशीतील अनेक मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते. जय पवार यांनी पाद्यपूजन केले, त्या नंतर पवार कुटुंबियांनी पुतळ्याचे लोकार्पण केले.

अजित पवार यांच्या स्मृतीप्रित्यर्थ विद्या प्रतिष्ठान विनोदकुमार गुजर बाल विकास मंदीरच्या विद्यार्थ्यांनी जेव्हा माझा आनंद हरपला हे गीत सादर केले तेव्हा सुनेत्रा पवार, विजया पाटील, जय पाटील यांना आपले अश्रू आवरता आले नाहीत. अनेकांचे डोळे अजित पवार यांच्या आठवणीने पाणावले.

ज्या तिरंगा सर्कलमध्ये बारामतीतील सर्वात उंच राष्ट्रध्वज स्वताः अजित पवार यांनीच पुढाकार घेऊन उभारला होता, त्याच्या शेजारीच अजित पवार यांचा पुतळा साकारण्यात आला आहे, अनेक बारामतीकरांनी या आठवणी जागवत दादांच्या अत्यंत आवडत्या जागी त्यांचा पुतळा साकारल्याचे या प्रसंगी नमूद केले.