बनावट इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे महिलेचा मानसिक छळ, नग्न फोटोची मागणी; बारामतीतील युवक अटकेत

बनावट इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे महिलेचा मानसिक छळ, नग्न फोटोची मागणी; बारामतीतील युवक अटकेत

 

बारामती: फेक इन्स्टाग्राम अकाऊंट तयार करून एका महिलेला अश्लील संदेश पाठवत तिच्याकडून नग्न फोटो आणि व्हिडिओ मिळविण्याचा प्रयत्न करणाऱ्या करंजे (ता. बारामती) येथील एका युवकाविरुद्ध वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपीला अटक करण्यात आली असून त्याच्या मोबाईलची फॉरेन्सिक तपासणी करण्यात येणार असल्याने या प्रकारामागील आणखी धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिपक मधुकर दुबळे (रा. करंजे, ता. बारामती) याने एका महिलेच्या नावाने बनावट इन्स्टाग्राम आयडी तयार केला.

या बनावट आयडीद्वारे त्याने फिर्यादी महिलेशी संपर्क साधत अश्लील स्वरूपाचे फोटो पाठविले. त्यानंतर, “तुझे खासगी फोटो व्हायरल करायचे नसतील तर माझ्याशी नग्न अवस्थेत व्हिडिओ कॉलवर बोल,” अशी धमकी देत तिच्यावर मानसिक दबाव आणल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

तक्रारीनुसार, आरोपीने महिलेकडून मिळालेले फोटो आणि व्हिडिओ आपल्या मोबाईलमध्ये जतन करून परिसरातील काही व्यक्तींना पाठविले. त्यामुळे संबंधित महिलेची बदनामी झाली असून तिच्या मनास लज्जा व मानसिक त्रास सहन करावा लागल्याचे नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणी वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यात माहिती तंत्रज्ञान अधिनियमासह संबंधित कायद्यांतील विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला अटक करून बारामती न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

दरम्यान, आरोपीने अशाच प्रकारे इतर महिलांनाही लक्ष्य केले आहे का, याचा तपास सुरू असून त्याचा मोबाईल जप्त करण्यात आला आहे. मोबाईल फॉरेन्सिक प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात येणार असून त्यातून आणखी काही पीडित किंवा डिजिटल पुरावे समोर येण्याची शक्यता असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.