'सोमेश्वर' कार्यक्षेत्रात ६,८०० एकरांवर आडसालीची ऊस लागवड

'सोमेश्वर' कार्यक्षेत्रात ६,८०० एकरांवर आडसालीची ऊस लागवड

 

सोमेश्वरनगर: या वर्षी सोमेश्वर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात दुष्काळी परिस्थिती असतानाही मागील वर्षांइतकीच ऊस लागवड करण्यात आली आहे. दुष्काळी परिस्थितीशी सामना करून आणि पाण्याचे नियोजन करत "सोमेश्वर"च्या शेतकऱ्यांनी तब्बल ६,८०० एकरांवर आडसाली ऊसाची लागवड केली.

दि. ५ रोजी सोमेश्वर कारखान्यात आडसाली ऊस लागवडीचा लकी ड्रॉ संपन्न झाला. यावेळी अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, ज्येष्ठ संचालक राजवर्धन शिंदे, ऋषिकेश गायकवाड, शेतकरी अधिकारी बापूराव गायकवाड यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. कारखान्याने १ जुलैपासून आडसाली ऊस लागवडीचा हंगाम सुरू केला असून त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. यंदा शेतकऱ्यांनी फुले ०२६५ आणि को-८६०३२ या ऊस जातींची लागवड केली असून रोपांच्या लागवडीस शेतकऱ्यांनी प्राधान्य दिले आहे. दरवर्षी मे महिन्यात पडणारा मान्सून यावर्षी जुलै उजाडला तरी सोमेश्वरच्या कार्यक्षेत्रात पडला नाही. त्यामुळे आहे तो मोठा ऊस टिकवायचा की नव्या उसाची लागवड करायची, या द्विधा मनस्थितीत शेतकरी सापडला. मात्र निसर्गावर विश्वास ठेवत शेतकऱ्यांनी १ जुलै या तारखेला ६,८०० एकरावर ऊस लागवड केली. ही लागवड गेल्या वर्षाच्या तुलनेत केवळ ३०० एकरांनी कमी आहे.

निसर्गावर विश्वास ठेवत शेतकऱ्यांनी १ जुलै या तारखेला ६,८०० एकरावर ऊस लागवड केली.

सोमेश्वरच्या शेतकऱ्यांनी ८६०३२ उसाच्या रोपांना प्राधान्य दिले असून, त्याखालोखाल फुले ०२६५ नंतर टिपरी लागवडीला प्राधान्य दिले आहे. आज सोमेश्वर कारखान्याच्या कार्यस्थळावर ऊस लागवडीचा लकी ड्रॉ पार पडला, ज्यामध्ये आडसालीच्या ६,८०० एकरांवर ऊस लागवडीचा लकी ड्रॉ पद्धतीने ड्रॉ काढण्यात आला. शेतकी विभागाच्या वतीने रमेश जगताप, अजित जगताप, उमेश ढवळे, महेश जगताप, रणजित भोसले, नितीन जगताप, गोपाळ भोसले, कल्याण जगताप, गोपीचंद भोसले, उमेश रणवरे यांनी या कार्यक्रमासाठी मेहनत घेतली.