५ जुलैला दादरमध्ये 'रामरक्षा' आंदोलन; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
मुंबई: अयोध्येतील राम मंदिरातील देणगी चोरी प्रकरणावरून शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपावर निशाणा साधला. तसेच येत्या रविवारी म्हणजेच ५ जुलै रोजी दादर येथील हनुमान मंदिराजवळ भव्य 'रामरक्षा' आंदोलन करण्याची घोषणा केली. आज पत्रकार परिषद घेऊन ठाकरे यांनी ही घोषण करत भाजपावर टीका केली.
यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले,"भाजपचं मूळ राम मंदिर आंदोलनात आहे आणि त्या आंदोलनात आम्हीदेखील त्यांच्यासोबत सहभागी होतो. राम मंदिर आंदोलन सुरू झालं, तेव्हा भाजपकडे केवळ दोन खासदार होते. हिंदुत्वाचा मुद्दा घेऊन ते पुढे आले, शिवसेनाप्रमुखांनी देश-राज्यभर दौरे केले, भाजपने रथयात्रा काढली तेव्हाही शिवसेना त्यांच्यासोबत खंबीरपणे उभी होती. त्यानंतर देशात दंगली, बॉम्बस्फोट झाले आणि त्याचा त्रास अनेक हिंदूंनी सहन केला. या आंदोलनानंतर आज भाजप देशात अमर्याद सत्ता उपभोगत आहे, पण आज भाजपच्या काळात राम मंदिर एका वेगळ्याच आणि चुकीच्या कारणांमुळे चर्चेत आलं आहे." सध्या संपूर्ण देशात एक प्रकारची अनास्था निर्माण झाली असून कोणालाच कोणत्याही गोष्टीचं उत्तरदायित्व राहिलेलं नाही, अशी खंतही उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली.
'दादरमध्ये ५ जुलैला रामरक्षा आंदोलन'
"एकदा अटलबिहारी वाजपेयी म्हणाले होते की अब हिंदू मार नही खायेगा, तसे मी म्हणतोय की, मंदिर लुटारूंना अब हिंदू माफ नहीं करेगा. जे जे मंदिर लुटत आहेत त्यांना हिंदू त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. त्याची सुरुवात आम्ही येत्या रविवारपासून करतो आहोत. रविवारी दादरमधील हनुमान मंदिरासमोर रामरक्षा आंदोलन होणार आहे. या आंदोलनासाठी सर्वांनी एकत्र या. तिथे रामरक्षा आंदोलनाची सुरुवात करुया, असेही उद्धव ठाकरेंनी जाहीर केले.
'आता ऑपरेशन राम मंदिर भाजप करतंय का?'
"भाजपाच्या काळात राम मंदिराचा मुद्दा वेगळ्या एका गोष्टीमुळे चर्चेला जातोय, हे दुर्दैव आहे. राजकीय पक्ष तोडले जात आहेत, आमदार गोव्यात किंवा इतरत्र पळवले जात आहेत, खरेदी-विक्री होते आहे आणि याला 'ऑपरेशन' नाव दिले जाते. मग आता ऑपरेशन राम मंदिर भाजप करतंय का? हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणून मला असं वाटतं की, या सगळ्या बातम्या दाखवल्या जात असतील, नसतील, बातम्या छापून येत असतील नसतील, पण राम मंदिरावरती दरोडा तर टाकला जातोय, टाकला गेला, त्याचे पुरावे सुद्धा दिले आहेत, असेही ठाकरे म्हणाले.