२ शिफ्टमध्ये काम, सुट्टीच्या दिवशीही ताण वाढला; तुकाराम मुंढेंविरोधात २९ अधिकारी एकवटले
१५ जुलैला पाठवलेल्या या पत्रात २ शिफ्टमध्ये काम, शनिवार-रविवारच्या सुट्टी दिवशीही कामाचे आदेश आणि रिक्त पदांमुळे कर्मचाऱ्यांवर येणारा ताण याबाबत उल्लेख करण्यात आला आहे. या तक्रार पत्रावर अधिकारी, कर्मचारी यांनी सह्याही केल्या आहेत. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी ही लेखी तक्रार तुकाराम मुंढे यांच्या कार्यशैलीविरोधात केली आहे. अन्न आणि औषध प्रशासनाच्या प्रयोगशाळेत अचानक २ शिफ्ट सुरू करण्याचा निर्णय घेतला गेला. परंतु त्यासाठी आवश्यक मनुष्यबळ विभागात नाही. रिक्त पदे मोठ्या प्रमाणावर असून विद्यमान कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा ताण पडत असल्याचा आरोप अधिकारी-कर्मचाऱ्यांनी केला आहे.
त्याशिवाय सकाळी ९ ते रात्री १२ अशा वाढीव वेळेत काम करावे लागते. शनिवार, रविवार आणि सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही काम करण्याचे आदेश कर्मचाऱ्यांना देण्यात आल्याने ही नाराजी वाढली आहे. वाढलेल्या कामाच्या तुलनेत अतिरिक्त कर्मचारी, तांत्रिक सहाय्यक आणि इतर संसाधने उपलब्ध करून दिली नाहीत. प्रयोगशाळेत नमुन्यांचा निपटारा करण्यासाठी घाई केली जात असून त्यातून विश्लेषणाच्या गुणवत्तेवर परिणाम होण्याची भीती अधिकारी, कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली आहे. २ शिफ्टमध्ये काम करावे लागत असल्याने मनुष्यबळ वाढवावे. पूर्ववत कार्यालयीन वेळ लागू करावी आणि २ शिफ्टचा निर्णय बंद करावा अशी मागणी कर्मचाऱ्यांनी केली आहे.
दरम्यान, एकीकडे विभागातील अधिकारी कर्मचारी मुंढे यांच्या कामावर आक्षेप घेत आहेत तर दुसरीकडे मुंबई हायकोर्टानेही या विभागाच्या कारवाईच्या पद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलेत. केवळ खासगी आस्थापनांवर कठोर कारवाई न करता सरकारी आणि मंत्र्यांच्या मालकीच्या आस्थापनांचीही तपासणी करण्याचे निर्देश कोर्टाने दिले आहेत. मंत्रालय, उच्च न्यायालय, सरकारी आणि निमशासकीय कार्यालये यांच्या कॅन्टीनचीही तातडीने पाहणी करून शुक्रवारी अहवाल सादर करण्याचे आदेश कोर्टाने अन्न आणि औषध प्रशासनाला दिले आहेत.