पुणेकरांची ओळख असलेली 'MH-12'ची मालिका संपणार? नव्या गाड्यांना कोणता नंबर मिळणार? आरटीओचा मोठा निर्णय
पुणे: पुण्यातील वाहनधारकांसाठी एक मोठी अपडेट आहे. पुणेकरांची ओळख असलेली 'MH-12' ही मालिका संपण्याच्या उंबरठ्यावर आली आहे. सध्या उपलब्ध असलेले नंबर्स संपत आले आहे. यामुळे आता यापुढे वाहन घेणाऱ्यांना नंबर देण्याबाबत आरटीओ विभान मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे.
पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून देण्यात येणाऱ्या नंबरप्लेटवर सध्या दुचाकींसाठी झेड वाय तर चारचाकी वाहनांसाठी झेड डब्लू (ZW) ही सिरिज सुरू आहे. आरटीओच्या नियमानुसार झेडझेड ही मालिका संपल्यानंतर दोन इंग्रजी अक्षरांचा पर्याय संपणार आहे. दोनचाकी गाड्यांची नंबर मालिका काही दिवसातच संपणार आहे. तर चार चाकी गाड्यांची नंबर मालिका दोन महिन्यात संपणार आहे.
नवीन नंबर कसे असणार?
झेडवाय (ZY) आणि झेडडब्ल्यू (ZW) ही नंबर मालिका संपल्यानंतर पुणे आरटीओला नवीन मालिका सुरु करावी लागणार आहे. नव्या नंबरप्लेटसाठी पुणे आरटीओने दोन पर्याय ठेवले आहेत. यामध्ये पहिला पर्याय तीन अक्षरांच्या मालिकेचा आहे, यामुसार MH-12-AAA 1234 असे नंबर असणार आहेत. पण, यामुळे अक्षरे आणि अंकाची लांबी वाढू शकते. रस्त्यांवरील हायटेक सीसीटीव्ही आणि ऑटोमॅटिक नंबरप्लेट रेकग्निशन सिस्टीममध्ये लांब नंबर कॅप्टचर होण्यास अडथळे येवू शकतात. यामुळे वाहतुक नियम तोडणाऱ्यांवर कारवाई करण्यात अडचणी येऊ शकतात.
आरटीओने दुसरा पर्याय अल्फान्यूमेरिक मालिकेचा ठेवला आहे, यामध्ये अंकांचे आणि अक्षरांचे मिश्रण आहे. आरटीओने दुसरा प्रस्ताव राज्याच्या परिवहन विभागाकडे पाठवला आहे. मात्र, यात अक्षरासोबत जोडलेला अंक हा पुढील मुख्य नंबरचा भाग वाटू शकतो. अशा प्रकारच्या नंबर प्लेटसाठी सरकारी 'वाहन' प्रणाली आणि नंबरप्लेट निर्मिती यंत्रणेच्या डिजिटल डेटाबेसमध्ये मोठे तांत्रिक बदल करावे लागणार आहे. यामुळे आता यावर आरटीओ विभाग विचार करत आहेत. लवकरच यामध्ये मोठा बदल केला जाऊ शकतो.